Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.
या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात पतीने पत्नीला उल्लेख भूत असा केला. याविरोधात पत्नीने न्यायालयात धाव घेतली. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय दिला. यामध्ये पतीने आपल्या पत्नीचा उल्लेख 'भूत' आणि 'व्हॅम्पायर' असा केला होता. यामुळे पत्नीच्या भावनांना ठेच पोहोचली होती.
भावना दुखावल्याने ज्योतीने न्यायालयाचे दार ठोठावले. हे प्रकरण पटना हायकोर्टात पोहोचले. न्यायालयात याप्रकरणी दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या. यानंतर पाटना उच्च न्यायालयाने नालंदा न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने पती नरेश कुमार गुप्ता आणि सासरे सहदेव गुप्ता यांना जामीन मंजूर केला आहे.
1 मार्च 1993 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार नरेश कुमार गुप्ता आणि ज्योतीचा विवाह झाला होता. काही दिवस संसार नीट चालला. पण पुढे जाऊन दोघांमध्ये वाद होऊ लागले. भांडण टोकाला जाऊ लागली. आपल्या मुलीचा सासरच्या घरी शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप ज्योतीच्या वडिलांनी केला आहे. सासरच्यांनी हुंडा म्हणून गाडी मिळावी म्हणून हा छळ केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ज्योतीचे वडील कन्हैया लाल यांनी नरेश कुमार गुप्ता आणि वडील सहदेव गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे हे प्रकरण आणखीनच ताणले गेले.
प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण ज्योतीचा शारीरिक किंवा मानसिक छळ झाल्याचे सिद्ध करणारे कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज सापडले नाही. तसा तपास अहवालात उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. यानंतर पाटणा उच्च न्यायालयाने नालंदा न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे नरेश गुप्ता आणि त्यांचे वडील सहदेव गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे.
पती नरेश मला नेहमी भूत आणि पिशाच असे म्हणत असे. याप्रकरणी तिने गुन्हा दाखल झाला आणि याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांनी याचिकाकर्त्याची याचिकाही फेटाळली. 21व्या शतकात पत्नीला भूत म्हणणे हा मानसिक छळ आहे, असे ज्योतीच्या वडिलांनी म्हटले होते. यावर भाष्य करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नी अनेकदा एकमेकांसाठी अशी भाषा वापरतात. याला क्रूरतेच्या कक्षेत आणता येणार नाही.