रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘याला’ पाहताक्षणी पळतात फुकटे! कोण आहे हा 'करोडपती' TC?

Ticket Inspector: 

Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2024, 05:10 PM IST
रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘याला’ पाहताक्षणी पळतात फुकटे! कोण आहे हा 'करोडपती' TC? title=

Ticket Inspector: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही आतापर्यंत विदाऊट तिकिट प्रवास केला असेल तर आता ही सवय थांबवा कारण मध्य रेल्वेचा एक टीसी फुकट्या प्रवासांसाठी काळ ठरला आहे. या एकट्या टीसीने 2023-24 या एका वर्षात रेल्वेला फुकट्या प्रवाशांच्या दंडातून 1 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. मोहम्मद शम्स चांद असे या तिकिट अधिकाऱ्याचे नाव असून तो मुंबई डिव्हीजन, मध्य रेल्वेचा कर्मचारी आहे. 

2023-24 या आर्थिक वर्षात तिकिट अधिकारी मोहम्म शम्सने एकूण 10 हजार 686 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यातून त्याने रेल्वेला 1 कोटींचा फायदा करुन दिला. त्यांच्या या कामाचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. 

चांद यांनी 2021-22 मध्ये तर 1.25 कोटी इतकी दंडात्मक रक्कम गोळा केली होती. चांद ज्या ठिकाणी तिकिट तपासण्यासाठी उभे राहतील तिथल्या स्थानकातून प्रवास करणारे प्रवाशी विदाऊट जाण्याची रिस्क कधीच घेत नाहीत. ज्यांना चांद यांच्याबद्दल माहिती नसते किंवा तिकिट घेण्यात ज्यांना रस वाटत नाही ते चांद यांच्या दंडात्मक शिक्षेला पात्र ठरतात.  

मुंबई डिव्हिजनच्या बांदवनगाव येथे वरिष्ठ तिकिट तपासनीस सुनील नैनाली आणि चांद यांनी मिळून 10 हजार 428 फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 2 हजार 830 रुपयांचा दंड गोळा केला.  तर एमएम शिंदे यांनी 2023-24 या काळात 11 हजार 367 प्रकरणांमध्ये 1 कोटी 1 लाख 32 हजार 870 रुपये इतका दंड गोळा केला. 

हे तिकिट तपासनीस रोल मॉडेल म्हणून कार्य करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्न आणि कार्यवाहीमुळे रेल्वे उत्पन्नात वाढ होत आहे. यात त्यांच्या कार्यक्षमता, प्रामाणिकपणा दिसून येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.विना तिकिट रेल्वे प्रवास करु नका असे आवाहन रेल्वेकडून वारंवार करण्यात येत असते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास आणि चांगली सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असते. यासाठी मध्य रेल्वेकडून मुंबईतील रेल्वे स्थानके, मेल एक्सप्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेन यामध्ये तिकीट तपासनीस नेमण्यात आले असतात, असेही त्यांनी पुढे सांगितले.