New Rules From 1 April: आजपासून 'हे' महागले, नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार?

Rules Changes From 1st April 2023 : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी. कारण आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार असल्याने खिसा कापला जाणार आहे. 

Updated: Apr 1, 2023, 10:13 AM IST
New Rules From 1 April: आजपासून 'हे' महागले, नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार?

Rules Changes From 1st April 2023 in Marathi: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी. कारण आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार असल्याने खिसा कापला जाणार आहे. सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही. तर विमा पॉलिसीवरही कर लागू होणार आहे. नवे नियम लागू होणार असल्यानं गाड्यांच्या किंमतीही वाढणार आहेत.

दरम्यान, सीएनजी, पीएनजीच्या किंमतींतही बदल होण्याची शक्यता आहे. यासोबत टोल महागला आहे. तसेच औषधंही महागणार आहेत. तर शेअर बाजार, इन्कम टॅक्स आणि गुंतवणुकीच्या अनेक नियमांत बदल झालेत. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच आर्थिक गणित कोलमडणार असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आजपासून चांदी, पितळ,  सिगारेट, सोने, प्लॅटिनम,आयात केलेले दरवाजे, खेळणी, सायकल, इलेक्ट्रिक किचन चिमणी महागणार आहे. तर आजपासून  मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने, टेलिव्हिजन संच, बॅटरी, कॅमेरा लेन्स, कॅमेरा स्वस्त होणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसचा टोल महाग

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास आजपासून महागला आहे. एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ झालीय...नवे दर आजपासून लागू झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नव्या दरानुसार कारचा टोल 270 रुपयांवरुन थेट 316 रुपये होणार आहे तर बस साठी टोलचा 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे.

सोने आणखी महागणार  

केंद्र सरकारने सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्कात 20 टक्क्यांवरुन 25 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सोने महाग होणार आहे. तर चांदीवर 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आले आहे.  यामुळे  चांदीच्या किमती वाढू शकतात.

कशी असणार नवी करप्रणाली?

आजपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे. अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणार आहे. म्हणजे 7.5 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही.  नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे. याआधी 5 लाख इतकी मर्यादा होती. 

गाड्या खरेदी महागणार

मारुती, होंडा, हुंडाई, टाटासह अनेक कंपन्यांनी वाहनाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गाड्या खरेदी महागणार आहे. आज एक एप्रिलपासून BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्स लागू होणार आहे. त्यानुसार कारची विक्री होणार आहे. यामुळे मारुती, होंडा, हुंडाई, टाटा या कंपन्यांचा कार महाग होणार आहेत. टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ केली आहे. 

दररोजची औषधे महागणार

दररोज घेण्यात येणारी औषधे महाग होणार आहे. पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे महाग होणार आहेत. सरकारने औषध कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. या औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी...

जुन्या गाड्यांना रोखण्यासाठी नवी पॉलिसी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्यावरील प्रदूषण आणि अपघात रोखण्यासाठी जुन्या वाहनांना रोखण्यासाठी सरकारकडून स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे.  स्क्रॅपिंग धोरणानुसार, 10 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी खासगी प्रवासी वाहनांना प्रदूषण आणि फिटनेस चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.