सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान एका वकिलाला चांगलंच फटकारलं. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) मधील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी सुरु होती. यावेळी सुनावणीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वकिलाला सरन्यायाधीशांनी खडेबोल सुनावले. NEET ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय परीक्षा आहे.
अधिवक्ता मॅथ्यूज नेदुमपारा हे एका याचिकाकर्त्याची बाजू मांडत होते. यावेळी याचिकाकर्त्याचंच प्रतिनिधीत्व करणारे नरेंद्र हुडा खंडपीठाला संबोधित करत असताना मॅथ्यूज त्यात व्यत्यय आणत होते.
खंडपीठाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नेदुमपारा म्हणाले की ते न्यायालयातील सर्व वकिलांपैकी सर्वात ज्येष्ठ आहेत. "मी उत्तर देऊ शकतो. मी मित्र आहे," असं ते म्हणाले. त्यावर सरन्यायाधीशांनी प्रत्युत्तर देत "मी कोणत्याही मित्राची नियुक्ती केलेली नाही" असं म्हटलं. पण वकील एवढ्यावरच थांबले नाहीत. "तुम्ही माझा आदर केला नाही तर मी निघून जाईन" असं ते म्हणाले.
यावर मात्र सरन्यायाधीश चांगलेच संतापले. "मिस्टर नेदुमपारा मी तुम्हाला चेतावणी देत आहे. तुम्ही गॅलरीत बोलणार नाही. मी कोर्टाचा प्रभारी आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा आणि यांना बाहेर काढा," असं सरन्यायाधीश म्हणाले. त्यावर वकिलाने प्रत्युत्तर देत म्हटलंकी, "मी निघतो आहे. मी जात आहे". त्यावर सरन्यायाधीशांनी "तुम्हाला असं म्हणण्याची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. मी गेली 24 वर्षं न्यायव्यवस्था पाहिली आहे. मी वकिलांना या न्यायालयातील कार्यपद्धती ठरवू देऊ शकत नाही", असं खडसावलं.
नेदुमपारा मात्र एवढ्यावर थांबले नव्हते. ते म्हणाले, मी ते 1995 पासून पाहिली आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी आपल्याला निर्देश द्यावे लागतील, असा इशारा दिला. "मला काहीतरी जारी करावे लागेल जे योग्य नाही. तुम्ही इतर कोणत्याही वकिलाला अडथळा आणणार नाही".
यानंतर नेदुमपारा निघून गेले. काही वेळाने ते परतले आणि माफी मागितली. "मला माफ करा. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मला अन्यायकारक वागणूक देण्यात आली," असं ते म्हणाले. इतकंच नाही तर मी सरन्यायाधीशांना माजा अपमान केल्याबद्दल माफ करतो असंही म्हटलं. यावेळी त्यांनी बायबलमधील संदर्भ दे म्हटलं की, "फादर, त्यांना क्षमा करा, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहित नाही".
मॅथ्यूज यांना कोर्टरूममधील वर्तवणुकीबद्दल सरन्यायाधीशांनी फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चमध्ये इलेक्टोरल बॉण्ड्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ते सुनावणीदरम्यान वारंवार हस्तक्षेप करत होते. एका क्षणी सरन्यायाधीश म्हणाले, "माझ्यावर ओरडू नका... ही हायड पार्क कॉर्नर मीटिंग नाही, तुम्ही कोर्टात आहात. तुम्ही अर्ज दाखल करा. मी सरन्यायाधीश म्हणून माझा निर्णय दिला आहे. आम्ही तुम्हाला ऐकायला आलेलो नाही. जर तुम्हाला अर्ज दाखल करायचा असेल तर मेल करा. हाच या न्यायालयाचा नियम आहे".