close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदी सरकारला मोठा धक्का; भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार नाकारला

नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये असंतोष

Updated: Feb 12, 2019, 02:49 PM IST
मोदी सरकारला मोठा धक्का; भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार नाकारला

गुवाहाटी: केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारण विधेयकाचा विरोध करण्यासाठी दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी तसेच दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख आणि दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांना‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला होता. भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या याच योगदानाचा गौरव म्हणून हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 

मात्र, आता हजारिका यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेत काही दिवसांपूर्वीच मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या विधेयकाच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आसामसह पूर्वेकडील राज्यांमधील स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याच मुद्द्यावरून आसाम गण परिषदेने भाजपची साथ सोडली होती.

नागरी कायद्याला विरोध; संगीतकार अरिबम श्याम शर्मांकडून पद्मश्री परत

या विधेयकामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बुद्ध आणि पारशी समुदायाच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापैकी कोणत्याही धर्माची व्यक्ती सहा वर्षांपेक्षा अधिक काळ भारतात वास्तव्याला असल्यास त्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. यापूर्वी नागरिकत्वासाठी १२ वर्षांचा कालावधी आवश्यक होता.