PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांचा प्रयत्न फसला.

Updated: Apr 17, 2022, 11:35 PM IST
PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का title=

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पर्याय आणि विरोधकांचा चेहरा म्हणून स्वत:ला पुढे करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी 13 विरोधी पक्षांनी देशातील बिघडलेल्या सांप्रदायिक परिस्थितीवर संयुक्त निवेदन जारी केले होते. या संयुक्त निवेदनात केसीआर यांचा समावेश नव्हता. तर, केसीआर समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षेला तडा गेला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, (Sonia Gandhi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यासह १३ विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. यामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समितीशिवाय तेलगू देसम पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) यांचाही समावेश नव्हता.

विरोधकांच्या ऐक्यात पुन्हा फूट

तीन पक्ष वगळता 13 विरोधी पक्षांचे एकत्र येणे हे विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट म्हणून पाहिले जात आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून केसीआर वेगळे राहण्याचे संकेतही आहेत. तर, यापूर्वी केसीआर यांनीही भाजपशी लढण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याअंतर्गत त्यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली. फेब्रुवारीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला, जिथे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली.

विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केसीआर यांनी केवळ आपल्याच राज्यातच नव्हे तर इतर राज्यातही हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठिंबा दिल्याबद्दल आवाज उठवला होता.

काँग्रेसला सतत निवडणुका हरत आहे. असे असतानाही विरोधी पक्षात केवळ काँग्रेसच मोठा चेहरा असू शकतो, असे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सामावून घेतल्याशिवाय तिसरी आघाडी शक्य नसल्याचे सांगितले होते.