close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील; अमित शहांचा दावा

देशभरात दौरे केल्यानंतर जे चित्र पाहिलं, त्या आधारे आपण हा अंदाज बांधत असल्याचे शहा यांनी सांगितले.

Updated: May 15, 2019, 05:44 PM IST
लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील; अमित शहांचा दावा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, प्रसारमाध्यमांकडून मला नेहमी भाजप किती जागा जिंकणार, असा प्रश्न विचारला जातो. मी प्रचारासाठी देशभरात फिरलेल्या ठिकाणचा जनतेचा प्रतिसाद पाहता पाचव्या आणि सहाव्या टप्प्यानंतरच भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे, हे मी खात्रीने सांगतो. सातव्या टप्प्याच्या मतदानानंतर हा आकडा ३०० च्या वर जाईल. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एनडीएचे सरकार स्थापन करतील, असा दावा अमित शहा यांनी केली. 

येत्या १९ तारखेला लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होईल. यानंतर लोकसभेच्या ५४३ जागांवरील मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याची उत्कंठा आणखी वाढेल. केंद्रात बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची गरज असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती २८२ जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन केले होते. मात्र, यंदा भाजपला अशी कामगिरी जमणार नाही, असा अंदाज अनेक राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

मात्र, अमित शहा यांनी भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे सांगत सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही, या आशेने गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून बहुतमाच्या आकड्यासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. मात्र, या सगळ्यामुळे भाजपला कोणताही फरक पडत नाही. कारण, भाजपच्या जागा कमी होणार नाहीत, असेही अमित शहा यांनी सांगितले.