'ज्या मोदींच्या वडिलांबाबत कोणालाही धड माहिती नाही ते गांधी घराण्याकडे हिशेब मागतायंत'

देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींना कोण ओळखत होते.

Updated: Nov 25, 2018, 05:16 PM IST
'ज्या मोदींच्या वडिलांबाबत कोणालाही धड माहिती नाही ते गांधी घराण्याकडे हिशेब मागतायंत'  title=

बारमेर: ज्याच्या वडिलांबद्दल कोणालाही माहिती नाही, ती व्यक्ती आज पिढीजात राजकारणाचा वारसा असलेल्या राहुल गांधींकडे हिशेब मागत आहे, अशा शेलक्या शब्दांत काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते शनिवारी राजस्थानच्या बारमेर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नादात मुत्तेमवार यांची जीभ भलतीच घसरली. त्यांनी म्हटले की, देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींना कोण ओळखत होते. आजही तुमच्या वडिलांबद्दल कोणालाही धड माहिती नाही. राहुल गांधी यांच्या वडील राजीव गांधींना सारा देश ओळखतो. राजीव गांधी इंदिरा गांधींचे पूत्र होते हेदेखील जनतेला ठाऊक आहे. इंदिरा या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कन्या होत्या. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याबद्दलही सगळ्यांना माहिती आहे. 

एकूणच राहुल गांधी यांच्या मागील चार-पाच पिढ्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. पण, ज्या पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत कुणालाच काही माहिती नाही, ते राहुल गांधींकडे हिशेब मागतात’, असे मुत्तेमवार यांनी म्हटले. 

मुत्तेमवार यांच्या या आक्षेपार्ह विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सी.पी. जोशी यांनी नरेंद्र मोदींविषयी जातीवाचक टिप्पणी केली होती.  या देशात हिंदू धर्माविषयी कोणाला माहिती असेल तर ते पंडित आणि ब्राह्मण आहेत. मात्र, लोधी समाजाच्या उमा भारती किंवा मोदी हेदेखील आजकाल हिंदू धर्माविषयी बोलायला लागले आहेत. ब्राह्मणांना हिंदू धर्माविषयी काहीच कळत नाही, असा सर्वांचा समज झालाय. त्यामुळे हा देश चुकीच्या मार्गाने चालला आहे, असे जोशी यांनी म्हटले होते.