भाजपच्या गडात कॉंग्रेसची खेळी, ग्लॅमरस उमेदवारामुळे भाजपची भंबेरी

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा यासाठी कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांकडून स्वच्छ प्रतिमेच्या आणि सोबतच शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिलं जात आहे.

Updated: Nov 29, 2017, 01:54 PM IST
भाजपच्या गडात कॉंग्रेसची खेळी, ग्लॅमरस उमेदवारामुळे भाजपची भंबेरी title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा यासाठी कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांकडून स्वच्छ प्रतिमेच्या आणि सोबतच शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिलं जात आहे.

राहुल गांधींच्या आक्रामकतेमुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसते आहे. अशातच कॉंग्रेसने भाजपला मात देण्यासाठी एक ग्लॅमरस महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजप विरोधात ग्लॅमरस उमेदवार

भाजपचा गड मानल्या जाणा-या अहमदाबादच्या मणिनगर येथील जागेवर कॉंग्रेसने ही उमेदवार उभी केली आहे. ही उमेदवार ग्लॅमरस असण्यासोबतच आयआयएम-बी पासआऊट आहे. या महिला उमेदवाराचं नाव श्वेता ब्रम्हभट्ट आहे.

व्यवसायाने मॅनेजिंग कन्सलटंट 

व्यवसायाने मॅनेजिंग कन्सलटंट असलेल्या श्वेता यांना कॉंग्रेसने मणिनगर जागेसाठी भाजपच्या सुरेश पटेल यांच्या विरोधात उभे केले आहे. पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसमोर श्वेता यांना उभे केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

याआधीही एकदा श्वेता नावाला उमेदवारी

दरम्यान, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसने या जागेवर आयपीएस संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यांनी उभे केले होते. आता यावेळी श्वेता ब्रम्हभट यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसने हा डाव खेळला आहे.

श्वेता ब्रम्हभट यांची पार्श्वभूमी

श्वेता ब्रम्हभट यांच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर त्यांचे वडील नरेंद्र ब्रम्हभट हे कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांनी २००० मध्ये अहमदाबादमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवली होती. श्वेता यांनी लंडनच्या वेस्ट मिनस्टर युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. यासोबतच त्यांनी एचएसबीसी आणि डराशॉसारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही काम केलं आहे.