VIDEO: राहुल गांधी विद्यार्थिनीला म्हणाले, मला सर नको फक्त राहुल म्हण...

राहुल गांधी यांचा हा व्हीडिओ नक्की पाहाच.

Updated: Mar 13, 2019, 05:08 PM IST
VIDEO: राहुल गांधी विद्यार्थिनीला म्हणाले, मला सर नको फक्त राहुल म्हण... title=

चेन्नई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी चेन्नईच्या स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. हे प्रश्न विचारताना साहजिकच सर्वजण राहुल गांधी यांचा आदरार्थी उल्लेख करत होते. हे सर्व सुरु असताना एक विद्यार्थिनी राहुल यांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. ती सर बोलून प्रश्न विचारायला सुरुवात करणार इतक्यात राहुल गांधी यांनी तिला थांबवले आणि तुम्ही मला सर ऐवजी फक्त राहुल म्हणा, असे सांगितले. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांनी चेकाळत एकच जल्लोष केला. अखेर या विद्यार्थिनीने कसाबसा धीर गोळा करत राहुल यांना एकेरी हाक मारली आणि आपला प्रश्न विचारला. मात्र, या सगळ्या प्रसंगामुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. त्यामुळे सध्या या प्रसंगाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राहुल यांनी नेहमीच्या पेहरावात न येता टीशर्ट आणि जीन्स असे कपडे घातले होते. आपल्या या कृतीने त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. 

राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यासोबत सुट्टीसाठी गोव्यात गेले होते. याठिकाणीही त्यांनी सामान्य लोकांसोबत सेल्फी काढले होते. सोनिया आणि राहुल यांना सामान्य लोकांप्रमाणे वावरताना पाहून अनेकजण अचंबित झाले होते. यानंतर संसदेच्या अधिवेशनादरम्यान राहुल गांधी दिल्लीतील एका साध्या हॉटेलमध्ये गेले होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील काम आटोपल्यानंतर राहुल यांनी आपला मोर्चा दक्षिण दिल्लीतील अशोक हॉटेलकडे वळवला. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत मोजकेच सुरक्षारक्षक होते.