काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना, काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाविरूद्धच मोर्चा उघडलाय.

Updated: Dec 14, 2017, 05:44 PM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव  title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच, काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाविरूद्धच मोर्चा उघडलाय. निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप करत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज निवडणूक आयोगाला घेराव घातला.

आयोगाच्या नवी दिल्ली कार्यालयासमोर महिला आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपला मतदान करण्याचं आवाहन करून आचारसंहितेचा भंग केला. पण आयोग काहीच कारवाई करत नाही. काँग्रेस आणि भाजपला वेगळा न्याय का? असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. पोलिसांनी सुरक्षा कठडे करून या कार्यकर्त्यांना सध्या थोपवून धरलं.

मोदींच्या रोड शोवरही काँग्रेसला आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय. मोदींनी घेतलेला रोड हा निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय निवडणूक आयोग मोदींच्या दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी दिल्लीत केलाय.

मोदींनी साबरमतीच्या बुथ नंबर ११५ मध्ये मतदान केल्यानंतर स्वतःच्या गाडीतून जनतेला हात दाखवत अभिवादन केलं. हा एकप्रकराचा प्रचारच असल्याचा काँग्रेसाचा आरोप आहे.