काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2019, 10:21 PM IST
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीतच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने लोकसभेच्या १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेशातल्या ११ आणि गुजरातमधील ४ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे पहिल्या यादीत स्पष्ट झाले आहे. प्रियंका रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या यादीमुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता दुसऱ्या यादीत कुणाला स्थान मिळते याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी काही वेळापूर्वीच जाहीर केली आहे. फारुकाबादमधून सलमान खुर्शीद लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता होती. मात्र, अद्याप तशी घोषणा झालेली नाही. लोकसभेची ही निवडणूक किती टप्प्यात होणार? त्याच्या तारखा काय असणार? निकालाची तारीख काय असणार हे सगळे स्पष्ट व्हायचे बाकी आहे. मात्र, काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे अन्य राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याची उत्सुकता आहे.