BREAKING : महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर, नाना पटोले यांची मोठी घोषणा! राहुल गांधी यांचा हिरवा कंदिल

काँग्रेस नेते राहुल गांधी राज्याचा दौरा करणार, नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली घेणार

Updated: Jul 20, 2021, 05:46 PM IST
BREAKING : महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर, नाना पटोले यांची मोठी घोषणा! राहुल गांधी यांचा हिरवा कंदिल

नवी दिल्ली : राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीये. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेअंती निवडणुका स्वबळावर लढण्याचं निश्चित कऱण्यात आल्याचं नाना पटोले म्हणाले. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीतल्या निवासस्थानी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली. या बैठकीत पुढच्या काळात पक्ष मजबुतीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबतची चर्चा झाली. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल यासाठी काम करण्याचे आदेश आपल्याला मिळाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तीन वर्षांवर आहेत याबाबतचा निर्णय हाय कमांड घेईल, पण आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढेल अशी माहिती या भेटीनंतर नाना पटोले यांनी दिली. 

विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच असेल असंही यावेळा नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नसल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली करणार असल्याची माहिती एच के पाटील यांनी दिली.