Odisha Train Accident: मुलीच्या 'त्या' एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव

Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: या दोघांनाही शनिवारी कटकमधील एका डॉक्टरांची अपॉइण्टमेंट होती. म्हणूनच ते शुक्रवारी रात्री कटकला पोहचण्याच्या दृष्टीने कोरामंडल एक्सप्रेसने कटकला जात होते. त्यावेळी ते प्रवास करत असलेल्या ट्रेनचा अपघात झाला. मात्र ते चमत्कारिकरित्या बचावले ते एका हट्टामुळे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 5, 2023, 06:19 PM IST
Odisha Train Accident: मुलीच्या 'त्या' एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव title=
या व्यक्तीनेच सांगितला हा थक्क करणारा घटनाक्रम

Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये अनेकांची कुटुंब उद्धवस्त केली आहेत. शुक्रवारी, 2 जून रोजी कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण अपघातात (Odisha Train Accident) 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांची संख्याही 1100 हून अधिक आहे. या अपघातामधून बचावलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथा समोर येत असून या गोष्टी वाचून आणि ऐकून 'देव तारी त्याला कोण मारी' हीच म्हण आठवते. असाच काहीसा प्रकार घडला कोरोमंडल एक्सप्रेसने त्या दिवशी प्रवास करणाऱ्या एम. के. देब यांच्याबरोबरच. देब हे त्यांच्या मुलीबरोबर अपघात झाला त्याच ट्रेनमध्ये होते. हे बापलेक कटकला जात होते. देब यांच्या मुलीने एक हट्ट केला आणि तो हट्ट पूर्ण केल्याने देब आणि त्यांची मुलगी आज जिवंत आहे.

रिझर्व्ह तिकीटवर करत होते प्रवास

देब हे त्यांच्या 8 वर्षीय मुलीबरोबर शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होते. देब हे 8 वर्षीय स्वातीबरोबर प्रवास करत असताना तिने एक हट्ट केला. हा हट्ट पूर्ण केल्यानेच आपल्याला नवीन आयुष्य मिळेल असा विचार देब यांनी अपघातापूर्वी केला नसेल. समोर आलेल्या माहितीनुसार देब हे त्यांची मुलगी स्वातीबरोबर खडगपूर रेल्वे स्थानकामध्ये ट्रेनमध्ये बसले. या दोघांनाही शनिवारी कटक येथे एका डॉक्टरांची भेट घ्यायची असल्याने ते शुक्रवारी रात्रीच कटकला पोहचणार होते. देब आणि त्यांच्या मुलीकडे थर्ड एसीचं तिकीट होतं. मात्र स्वातीने खिडकीमध्ये बसण्याचा हट्ट केला. 

'आम्ही त्यांना विचारलं अन् त्यांनी होकार दिला'

सरकारी कर्मचारी असलेल्या देब यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला. "आमच्याकडे विंडो सीटचं तिकीट नव्हतं. आम्ही टीसीकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की शक्य असेल तर तुमच्या स्तरावर तुम्ही इतर प्रवाशांबरोबर सीट बदली करुन घ्या. आम्ही दुसऱ्या डब्यात गेलो आणि तेथील दोघांना विनंती केली की आम्हाला विंडो सीट हवी आहे. त्यांनीही याला होकार दिला. हे दोन्ही प्रवासी आपल्या मूळ जागेवरुन आमच्या जागेवर बसण्यासाठी गेले. आम्ही या दोघांच्या जागेवर दुसऱ्या डब्यामध्ये बसलो," असं देब यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

...अन् थोड्याच वेळात झाला अपघात

जागांची ही अदलाबदली झाल्यानंतर काही वेळाने बालासोरमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये देब आणि त्यांची मुलगी सीट बदलून ज्या डब्यात बसली होती त्या डब्याला काहीच झालं नाही. मात्र ज्या ठिकाणी ते आधी बसले होते म्हणजेच जिथे त्यांचं मूळ रिझर्व्हेशन होतं त्या डब्याची फार हानी झाली. या डब्यातील अनेकांचा या अपघातात मृत्यू झाला. "आम्ही ज्या दोन प्रवाशांबरोबर आमच्या सीट बदलल्या त्यांच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली नाही. आम्ही ते सुरक्षित असोत अशी प्रार्थना करतो. तसेच हा चमत्कार घडवून आणण्यासाठी आम्ही देवाचेही आभारी आहोत," असं देब म्हणाले.

नक्की वाचा >> Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?

डॉक्टरांनाही बसला धक्का

किरकोळ जखमी झालेले देब आणि स्वाती स्थानिकांच्या मदतीने शनिवारी सकाळी कटकमध्ये पोहोचले. मुलीच्या डाव्या हाताला फोडी आल्या असून त्याच्या उपचारासाठीच ते डॉक्टरकडे पोहोचले. "मला जेव्हा या दोघांबरोबर घडलेला प्रकार समजला तेव्हा काय बोलावं हे मला सूचत नव्हतं. त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या होत्या," असं या चिमुकलीवर उपचार करणारे बालरोगतज्ज्ञ विक्रम सामल यांनी सांगितलं. 

नक्की वाचा >> Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

मृतांची ओळख पटलेली नाही

दरम्यान, या अपघातानंतर 51 तासांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे. दुसरीकडे या अपघातात मरण पावलेल्या 275 पैकी केवळ 104 मृतांची ओळख पटलेली आहे. 171 मृतदेहांची ओळख अद्याप पटेलेली नसल्याने यासंदर्भातील कामाला राज्य सरकारने गती दिली आहे.