Corona मुळे जुळ्या भावांचा मृत्यू, एकत्र जगात आले आणि एकत्रच जग सोडून गेले

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशात कहर

Updated: May 18, 2021, 02:14 PM IST
Corona मुळे जुळ्या भावांचा मृत्यू, एकत्र जगात आले आणि एकत्रच जग सोडून गेले

मुंबई : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशात कहर पाहायला मिळत आहे. अनेक जण फक्त वेदना आणि हतबलता यातून जात आहेत. कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. अनेक जण आपल्यापासून दूर निघून गेले. काही ठिकाणी तर अख्ख कुटुंब हे जग सोडून गेलं. अशीच एक वेदनादायक बातमी आहे मेरठची. जेथे 2 जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मेरठमध्ये राहणारे ग्रेगरी रेमंड राफेल आणि त्यांची पत्नी सोजा यांची दोन्ही मुले ही इंजीनिअर होती. जोफ्रेड आणि राल्फ्रेड अशी दोघांची नावे. दोघांनी 23 एप्रिलला आपला 24 वा वाढदिवस साजरा केला होता. पण कोणाला माहित होतं की, यानंतर त्यांच्या आयुष्यात हा दिवस कधीच येणार नव्हता. जन्मदिनाच्या दुसऱ्याच दिवशी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर 13 आणि 14 मे रोजी या दोन्ही भावांचा मृत्यू झाला. दोघांनी एकत्र या जगाचा निरोप घेतला.

दोन-दोन जवान मुलं गमवल्यानंतर वडिलांना देखील धक्का बसला आहे. कुटुंब काही क्षणात उद्धवस्त झालं. दोन्ही मुलांच्या जन्मामध्ये फक्त 3 मिनिटांचं अंतर होतं. वडिलांनी सांगितलं की, दोन्ही मुलं खूपच हुशार होती. दोघांनी कम्प्यूटर इंजीनिअरींग केलं होतं. आधी दोघं भावांनू घरीच उपचार घेतले. पण नंतर त्यांचा ऑक्सीजन लेवल 90 च्या खाली आला. त्यांनतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. 

twins news

1 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. 10 मे रोजी दोघेही निगेटिव्ह आले. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. 13 आणि 14 मे या दिवशी दोघांचा मृत्यू झाला. आई-वडील दोघेही शिक्षक होते. बी-टेक केल्यानंतर दोघेही मुलं चांगल्या कंपनीत नोकरी करत होते.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले. अशा वेळेत आपल्या संपर्कातील लोकांना आधाराची गरज आहे. कोरोना झाल्यानंतर अशा लोकांना मानसिक आधाराची अधिक गरज असते. कोरोनामुळे काहीही त्रास नसताना फक्त टेन्शन घेऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर ही अशा व्यक्तींसोबत काळजीपूर्वक सल्ला देणं महत्त्वाचं आहे.