बापरे! कोरोनाने भारतात 4 लाख नाही तर 50 लाख लोकांचा मृत्यू

अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, भारतातील मृत्यू दहापटीने अधिक असल्याचा दावा करण्यात आलाय.

Updated: Jul 21, 2021, 12:35 PM IST
 बापरे! कोरोनाने भारतात 4 लाख नाही तर 50 लाख लोकांचा मृत्यू title=

मुंबई : भारतात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं होतं. दरम्यान देशात कोरोनाची दुसरी लाट थोड्या प्रमाणात ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या 3 कोटी 12 लाखांहून अधिक आहे. तर, चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, हे मृत्यू दहापटीने अधिक असल्याचा दावा करण्यात आलाय.

अमेरिकन संशोधनाच्या अहवालात असा दावा करण्यात आलाय की, कोरोना संसर्गाने भारतावर गंभीर परिणाम केला आहे. भारतात कोरोनाच्या महामारीने 34 ते 47 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत, जे केंद्र सरकारच्या आकडेवारीपेक्षा 10 पट जास्त आहेत. 

जगभरात कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत दुसर्‍या आणि संक्रमित लोकांच्या मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे जगभरात संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.

वॉशिंग्टनमधील संशोधन संस्था 'सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट' यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज, सेरोलॉजिकल रिपोर्ट्स आणि घरगुती पाहणी याचा आधार घेण्यात आलाय. अमेरिकन अभ्यासाचा हा धक्कादायक अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये अरविंद सुब्रमण्यम यांचा समावेश आहे. 

अरविंद हे चार वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य आर्थिक सल्लागार होते. हा अहवाल तयार करणार्‍यांमध्ये अरविंद सुब्रमण्यम व्यतिरिक्त अभिषेक आनंद आणि जस्टीन सँडफर हेदेखील आहेत.

अरविंद सुब्रमण्यम, अभिषेक आनंद आणि जस्टीन सँडफर यांनी दावा केला आहे की मृतांची संख्या काही हजार नसून लाखोंमध्ये आहे. यापूर्वीही भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित करण्यात येत होत्या.

अमेरिकेतील संशोधन अभ्यासानुसार, जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात भारतात कोरोना महामारीने जवळजवळ 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. फाळणी आणि स्वंतत्र झाल्यानंतर भारतातील ही सर्वाधिक मृतांची संख्या आहे.