मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढला असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १६ मार्चला गोदान एक्स्प्रेसमधून मुंबई ते जबलपूर ४ जणांनी प्रवास केला. या चारही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
कालच या चौघांच्या टेस्टचे रिपोर्ट आले आहेत. गोदान एक्स्प्रेसच्या B-1 कोचमधून या चौघांनी प्रवास केला. मागच्याच आठवड्यात हे चौघं दुबईवरून भारतात परतले होते. संबंधितांना याप्रकरणी अलर्ट करण्यात आल्याचं ट्विट रेल्वेने केलं आहे. या चौघांसोबत त्या बोगीमध्ये नेमकं कोण होतं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Railways has found that 4 passengers travelling on Godan Express (Train 11055) from Mumbai to Jabalpur on 16th March in B1 Coach have been tested positive for COVID-19 yesterday.
They came to India from Dubai last week. All concerned have been alerted to take necessary action.
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 21, 2020
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा २९४ वर गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ६३ रुग्ण आहेत. राज्यात गेल्या काही तासात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले आहेत, यात मुंबईचे १० तर पुण्याचा १ रुग्ण आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे, पिंपरी आणि मुंबईचे आहेत.
सार्वजनिक वाहतूक टाळा,रस्त्यावर, रेल्वेमध्ये गर्दी करू नका असं पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलंय. गर्दी कमी झाली नाही तर बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, असं राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे.