एवढ्या रुपयांना मिळणार कोरोनाची लस, सिरमच्या अदार पुनावालांची माहिती

कोरोना व्हायरसची लस कधी येणार याकडे सगळ्या जगाचंच लक्ष लागलं आहे. 

Updated: Aug 7, 2020, 06:10 PM IST
एवढ्या रुपयांना मिळणार कोरोनाची लस, सिरमच्या अदार पुनावालांची माहिती title=

पुणे : कोरोना व्हायरसची लस कधी येणार याकडे सगळ्या जगाचंच लक्ष लागलं आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीवर चाचण्या सुरू आहेत. यातल्या बऱ्याच लसी या मानवी चाचण्यांच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यातल्याच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या मानवी चाचण्यांचे निकाल उत्साहवर्धक आले आहेत. 

भारतातल्या पुण्यात असलेली सिरम इन्स्टिट्यूटही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पार्टनर आहे, त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटही कोरोनाची लस बनवणार आहे. बाजारात येणाऱ्या या कोरोना लसीची किंमत किती असेल, याबाबत सिरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी माहिती दिली आहे. 

कोरोनाच्या लसीसाठी बिल ऍण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन गावी या आंतरराष्ट्रीय लस संस्थेला १५० मिलियन डॉलरची मदत देणार आहे. हा निधी कोरनाची लस बनवण्यासाठी वापरण्यात येईल, असं अदार पुनावाला यांनी सांगितलं. 

कोरोनावरची ही लस जास्तीत जास्त ३ अमेरिकन डॉलरना मिळेल. ३ डॉलरच्या हिशोबाने भारतामध्ये ही लस २२० ते २५० रुपयांमध्ये मिळेल. कोरोनासाठीची ही लस ९२ देशांमध्ये उपलब्ध केली जाईल, असंही पुनावाला या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

भारतातली सिरम इन्स्टिट्यूट २०२१ पर्यंत कोरोना लसीचे १०० दशलक्षपर्यंत डोस तयार करेल. ही लस भारत आणि अल्प तसंच मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी वापरले जातील, असं पुनावाला यांनी सांगितलं.