गरम पाणी पिऊन, आंघोळ करून कोरोना व्हायरस जातो का? सोबत पाहा योग्य आहार

बर्‍याच लोकांच्या मनात असे विचार आहेत की, गरम पाण्याने अंघोळ किंवा गरम पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरसला नष्ट केले जाऊ शकते.

Updated: May 8, 2021, 08:15 PM IST
गरम पाणी पिऊन, आंघोळ करून कोरोना व्हायरस जातो का? सोबत पाहा योग्य आहार

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, लोक व्हायरस टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न करतात आहेत. बर्‍याच लोकांच्या मनात असे विचार आहेत की, गरम पाण्याने अंघोळ किंवा गरम पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरसला नष्ट केले जाऊ शकते. केंद्र सरकारने या अफवांवर शनिवारी मायगोविंदियाच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, कोविड -19 गरम पाण्याने आंघोळ करून किंवा गरम पाणी पिऊन थांबवता येत नाही. गरम पाणी विषाणूचा नाश करत नाही किंवा या रोगावर उपचार देखील करत नाही. लॅब सेटिंग्जमध्ये समोर आले आहे की, कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी 60 ते 75 अंश तपमान आवश्यक आहे.

सरकारने या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांसाठी फाइव स्टेप मील प्लान (जेवणाची योजना) सुचविली आहे. असे म्हटले जात आहे की, कोरोना झाल्यामुळे लोकांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, त्यामुळे हा मील प्लान अशा रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

शासनाने खालील पाच स्टेप्स मील प्लान सांगितला आहे

1. भिजलेल्या बदाम आणि मनुकाचे सेवन करून दिवसाची सुरुवात करा. बदाम हे प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे आणि मनुका आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह पुरवते.

2. सकाळी न्याहारीसाठी, नाचणीचा डोसा किंवा एक वाटी डाळीचे सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे.

3. दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा त्यानंतर गूळ आणि तूप खाऊ शकता. त्याचबरोबर या दोन्ही गोष्टी चपाती सोबतही खाल्ल्या जाऊ शकतात.

4. रात्रीच्या जेवणाच्या वेळी साधी खिचडी खा. कारण त्यात आवश्यक ते सर्व पोषक असतात. ही खिचडी पचण्यास हलकी आहे आणि चांगल्या झोपेसाठी उपयुक्त आहे.

5. हायड्रेटेड रहाणे महत्वाचे आहे. त्यामुळे पाण्याव्यतिरिक्त आपण आपल्या घरी दररोज लिंबाचा रस आणि ताक प्यावे.