नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतेत असताना भारतात एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण वाढत आहेत. मात्र कोरोना संसर्ग झालेले रुग्ण पूर्णपणे बरे होत असल्याच्या टक्केवारीमध्ये वाढ होत आहे.
गेल्या एका आठवड्यातील आकड्यांनुसार मंगळवारी कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांची टक्केवारी 9.9 इतकी होती. तर बुधवारी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 11.41वर आली.
गुरुवारी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ती 12.02वर पोहचली. शुक्रवारी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा 13.06 टक्के इतका झाला.
शनिवारी सकाळी 9 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. टक्केवारीनुसार हा आकडा 13.85 टक्के इतका झाला आहे.
देशभरात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेले 14 हजार 378 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 480 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाची लागण झालेले 80 टक्के लोक बरे होत आहेत. तर 20 टक्के प्रकरणांमध्येच कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, भारतीय लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तसंच आजारांशी लढण्याची रोग प्रतिरोधक क्षमताही ठीक आहे.
भारतात कोरोना संक्रमणाचे दोन प्रकार दिसत आहेत. एक मध्यम वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण अधिक होत असल्याचं चित्र आहे. तर मृत्यू होणाऱ्यांमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींचा अधिक समावेश आहे.
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यामुळे देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाला मोठ्या प्रमाणात आळा घालता आला आहे. धोका अद्यापही टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचं पूर्णपणे पालन करणं आवश्यक असल्याचं सतत सांगण्यात येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, देशात कोरोना रुग्ण बरे होत असल्याची टक्केवारी, आकडा वाढत असला, तरी धोका टळलेला नाही. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून कोरोनावर मात करणं, त्याला मूळापासून नष्ट करण्यासाठी मदत करणं ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. जबाबदारीने सर्वांनी सरकारकडून सांगण्यात येत असलेल्या सूचनांचं, नियमांचं पालन करुन देशात एकही कोरोनाबाधित आढळू नये यासाठी मदत करणं अतिशय गरजेचं आहे.