Corona : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार?

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.

Updated: Apr 6, 2020, 10:24 PM IST
Corona : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार?

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास इन्श्यूरन्स कंपनी विम्याची रक्कम मृताच्या नातेवाईकांना देणार का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. काही इन्श्यूरन्स कंपन्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये Force Majeure हा क्लॉज टाकण्यात आला आहे. Force Majeure म्हणजे युद्धाची परिस्थिती, साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती आणि ऍक्ट ऑफ गॉड सारख्या परिस्थितीमध्ये कंपनी विमा रद्द करु शकते.

देशातल्या सगळ्या विमा कंपन्यांची संघटना असलेल्या लाईफ इन्श्यूरन्स काऊन्सिलने कोरोनामध्ये Force Majeure हा क्लॉज लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे, त्यामुळे कोणत्याच कंपनीला ग्राहकाचा विमा रद्द करता येणार नाही, तसंच कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला, तर विम्यानुसार आश्वासित केलेली रक्कम मृताच्या नातेवाईकांना द्यावी लागणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हफ्ता भरला नाही तरी ग्राहकांचा विमा रद्द होणार नाही. केंद्रीय अर्थमंत्रालयाने हा निर्णय घेऊन कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी जर गाडीचा थर्ड पार्टी इन्श्यूरन्स किंवा आरोग्य विमा रिन्यू केला नसेल, तर ते २१ एप्रिलपर्यंत हफ्ता भरून विमा रिन्यू करु शकतात. म्हणजेच २५ मार्चला एखादा विमा हफ्ता न भरल्यामुळे रद्द होणार असेल, तर अशाप्रकारचा विमा रद्द मानला जाणार नाही. २१ एप्रिलपर्यंत ग्राहक विम्याचा हफ्ता भरू शकतात.