ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फऱार घोषित केलं आहे. कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. कोर्टाने त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2024, 07:54 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित title=

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फरार जाहीर केलं आहे. जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचललं असून त्यांना फरार जाहीर केलं आहे. कोर्टाने पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे. 

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार असलेल्या जया प्रदा यांच्यावर निवडणुकीदरम्यान आचारसंहिताचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रामपूरच्या एमपीएमएलए स्पेशल कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आलेल्या अनेक तारखांनी जया प्रदा यांनी हजेरी लावली नाही. कोर्टाने वारंवार समन्स जारी केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात वॉरंट आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. पण त्या कोर्टात हजर झाल्या नव्हत्या. कोर्टाने एकूण सातवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. यानंतर पोलीस अधीक्षकांना वारंवार लिहून त्यांना हजर करण्याचा आदेश देण्यात आला. पण त्यानंतरही त्या हजर झाल्या नाहीत. यानंतर आता कोर्टाने कडक कारवाई करत त्यांना फरार घोषित केलं आहे. पोलिसांनी एक पथक तयार केलं असून, 6 मार्च 2024 पर्यंत हजर करण्यास सांगितलं आहे. 

यावर वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी सांगितलं की, जया प्रदा यांच्या विरोधात न्यायदंडाधिकारी एमपी-एमएलए न्यायालय, रामपूरमध्ये निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित खटला सुरू आहे. वारंवार समन्स बजावूनही त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आलं होतं. तरीही त्या हजर झाल्या नाहीत. पोलीस अहवालात त्यांचा मोबाईल बंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

82 सीआरपीसी अंतर्गत काय कारवाई केली जाते?

वरिष्ठ अभियोक्ता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 82 सीआरपीसी अन्वये होणाऱ्या कारवाईत आरोपी किंवा आरोपी हजर नसताना त्यांची हजेरी सुनिश्चित करण्यासाठी माननीय न्यायालयाकडून उद्घोषणा करण्याची कार्यवाही केली जाते. याला CrPC च्या कलम 82 अंतर्गत कारवाई म्हणतात. याचा अर्थ जयाप्रदा यांना फरार घोषित करण्यात आले आहे.