देशभरात गेल्या २४ तासांत १७१८ नवे रुग्ण; एकूण आकडा ३३ हजारांच्या पार

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Updated: Apr 30, 2020, 09:32 AM IST
देशभरात गेल्या २४ तासांत १७१८ नवे रुग्ण; एकूण आकडा ३३ हजारांच्या पार title=

नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊन संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७१८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत १०७४ लोकांनी जीव गमावला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आईने धान्य आणायला घराबाहेर पाठवले, मुलगा बायको घेऊन परतला

येत्या ३ मे रोजी देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी परराज्यांमध्ये अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा आपापल्या राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने सशर्त मंजुरी दिली आहे. मात्र, नागरिकांच्या या आदानप्रदानासाठी दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक असेल. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांनाच इतर राज्यांमध्ये पाठवले जाईल. तसेच निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलेल्या  बसमधून लोकांची वाहतूक व्हावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात उत्तरेकडील राज्यांमधील लाखो मजूर अडकून पडले  आहेत. या सगळ्यांना परत पाठवण्यासाठी एसटीच्या १० हजार बसेस सज्ज आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे एका बसमध्ये २० ते २५ प्रवाशीच बसू शकतात. त्यामुळे रस्तेमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर मर्यादा आहेत. परिणामी सरकारने किमान दोन ते तीन दिवस रेल्वे वाहतूक सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे.