कोरोनामुळे दगावलेल्या आईच्या अंत्यविधीसाठी रोखलं; मुलाने सांगितली व्यथा

कोरोनाचं थैमान काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे 

Updated: Mar 14, 2020, 04:31 PM IST
कोरोनामुळे दगावलेल्या आईच्या अंत्यविधीसाठी रोखलं; मुलाने सांगितली व्यथा
कोरोनामुळे दगावलेल्या आईच्या अंत्यविधीसाठी रोखलं; मुलाने सांगितली व्यथा

नवी दिल्ली : कोरोना Corona व्हायरसचा जगभरात सुरु असणारा धुमाकूळ दिवसागणिक वाढतच आहे. चीनपाठोपाठ भारतातही कोरोनाची लागण वाढू लागल्यामुळे प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. त्यातच कोरोनामुळे आता दिल्लीमघ्ये एका महिलेचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या महिलेवर शनिवारी निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पण, तत्पूर्वी या महिलेच्या नातेवाईकांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापासून रोखलं होतं. मृतांच्या नातेवाईकांनी जेव्हा लोधी मार्गावर असणाऱ्या स्मशानात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला. 

मृतांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या (मृत) महिलेचं शव रात्री एक वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून रुग्णवाहिकेत घेण्यात आलं होतं. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह घेऊन ते निगमबोध घाट येथे आले. पण, इथे प्रथमत: मात्र अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. 

या संपूर्ण प्रसंगाविषयी सांगताना महिलेचा भाचा म्हणाला, 'मृतदेह लोधी मार्ग येथे आणण्यास सांगण्यात आलं. जिथे त्यांच्यावर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार होतील असं सांगण्यात आलं. पण, लोधी मार्गावर फोन केला असता त्यांनी मात्र यासाठी नकार दिली. जवळपास ३ तास मृतदेह आम्ही इथून तिथे फिरवतच होतो. पोलिस, स्थानिक नेते सर्वांना याविषयी सांगितलं. जागोजागी फोन लावले अखेर त्याच्यावर दबाव वाढला तेव्हा अंत्यसंस्कारासाठीची परवानगी मिळाली.'

तुम्ही फक्त विचार करा, एका मुलावर नेमका काय प्रसंग ओढावला असेल ज्याला त्याच्या आईचा मृतदेह घेऊन इथून तिथे फिरावं लागत होतं, ज्यावर अंत्यविधी करु दिले जात नव्हते. प्रशासनही तेव्हा झोपलंच होतं, कोणीच याचा विचारही केला नाही; या शब्दांत महिलेच्या मुलाने त्याचं दु:ख व्यक्त केलं. आपली चाचणी धाली असून, कोरोनाची लक्षणं न आढळल्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली. 

'माझ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेह घरातच पडलाय'  

कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्यूनंतर जवळपास तीन तास अंत्यविधी कसा होणार याच मुद्द्यावर वाद सुरु होता. या अंत्यसंस्कारामध्ये फक्त कुटुंबातीलच व्यक्तींचा समावेश होता. शिवाय काही डॉक्टरांचीही अंत्यसंस्कारावेळी उपस्थिती होती.