अलिगढ : प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात, म्हणूनच माणूस प्रेमासाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार असतो. परंतु प्रेमात असलेला माणूस इतका प्रेमात बुडतो की, तो कधीही दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचार करत नाही. कधी कधी हे प्रेम इतकं आंधळं होऊन जातं की, मग ही व्यक्ती असं काही मोठं पाऊल उचलते की, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला धोका निर्माण होतो आणि तो माणूस स्वत: देखील त्यात फसतो.
अशीच एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. एक तरुण महिला कॉन्सेटेबलच्या प्रेमात इतका वेडा झाला की, त्याने आपली पत्नी आणि दोन मुलांची आपल्या राहात्या घरात हत्या केली. एवढेच नाही, त्यानंतर आरोपीनी तिघांचे मृतदेह घराच्या तळघरात पुरले आणि कोणालाही कळू नये म्हणून त्यावर सिमेंट टाकूनवर लाद्या लावून घेतल्या जेणेकरुन कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही.
परंतु तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी कहरच केला. त्याने स्वत: च्या मृत्यूचा कट रचला आणि त्यामध्ये पत्नीच्या माहेरच्यांना अडकवण्याचा त्याने प्रयत्न केला.
एसपी रोहन प्रमोद बोत्रे यांनी सांगितले की, काळुआ पोलीस स्टेशन मरहारा एटा येथील रहिवासी मोती लाल यांनी त्यांची मुलगी रत्नेशचे लग्न 2012 मध्ये राकेश सोबत केलं. राकेश हा मुळचा अलिगढमधील नौगावा गंगिरी गावातील रहिवासी आहे. लग्नाआधी राकेशचे गावातील रुबी या मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर पती राकेश आणि पत्नी रत्नेश यांना 3 वर्षांची एक मुलगी होती आणि एक लहान मुलगा होता.
मुलं झाल्यावर राकेशने नोएडामधील पंच विहार कॉलनी पोलीस स्टेशन बिसरख येथे एक घर विकत घेतले आणि त्यामध्ये कुटुंबासह राहण्यास सुरुवात केली. राकेश नोएडामध्येच प्रयोगशाळेत काम करायचा.
लग्नानंतरही राकेश आणि रुबीचे अफेअर सुरूच होते. राकेशला आता बायकोसोबत राहायचे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला मार्गातून काढून रुबीशी लग्न करण्याचा विचार केला. या योजनेत त्याची मैत्रीण रुबी, वडील बनवारीलाल, भाऊ राजीव कुमार, प्रवेश आणि आई इंद्रावती यांनी पूर्ण साथ दिली.
या योजनेअंतर्गत 14 फेब्रुवारी 2018 रोजी राकेशने त्याची पत्नी रत्नेश आणि दोन्ही मुले अवनी आणि अर्पित यांना घराच्या तळघरात बोलावले आणि तिघांना लोखंडी रॉडने ठार मारले. त्यानंतर त्यांने त्यांचे मृतदेह त्याच घराच्या तळघरात पुरले आणि वर सिमेंट टाकून फरशी बसवल्या.
हे सगळं केल्यानंतर जेव्हा आरोपी पतीने पत्नीच्या कुटुंबीयांना तिच्या आणि मुलांच्या बेपत्ता होण्याविषयी सांगितले, तेव्हा रत्नेशच्या घरच्यांना जावयावर संशय आला आणि त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण टाळण्यासाठी राकेशने सासरच्या लोकांविरुद्ध कट रचला.
आरोपीने स्वत: ला वाचवण्यासाठी स्वतःच्याच हत्येचा कट रचला आणि त्यामध्ये पत्नीच्या घरच्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने त्याच्या सारख्याच दिसणाऱ्या मित्राला कासगंजमध्ये बोलावले आणि त्याची हत्या केली.
मित्राचा त्याचा चेहरा ओळखला जाऊ नये, म्हणून त्याने त्याचा चेहरा विकृत केला आणि स्वत:चे आय-कार्ड त्याच्या खिशात ठेवले आणि त्याला आपले कपडे घातले. आरोपी मुलासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्यही या कटात सहभागी असल्याने वडील आणि भावाने मृतदेहाला हा आपल्याच मुलाचा असल्याचे पोलिसांना सांगितले.
यानंतर त्यांनी सासरच्या लोकांविरुद्ध आपल्या मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना या प्रकरणात संशय येऊ लागला म्हणून त्यांनी डीएनए चाचणी केली, त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरल्याने त्यांनी हत्येचा मुख्य सूत्रधार राकेश आणि त्याची मैत्रीण कॉन्स्टेबल रुबीसह कुटुंबीयांना अटक केली, तेव्हा हा खळबळजनक खुलासा झाला.