गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 2 कोटींचा खर्च अन्... विमानतळावरच नवरीला सोडून मुलाने काढला पळ

Crime News : 25 लाख रुपये घेऊनही बीएमडब्ल्यू कारची मागणी पूर्ण न झाल्याने वधू आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर वधूला विमानतळावर सोडले आणि पळ काढला.

Updated: Apr 9, 2023, 06:49 PM IST
गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 2 कोटींचा खर्च अन्... विमानतळावरच नवरीला सोडून मुलाने काढला पळ title=

Crime News : कितीही नाही म्हटलं तरी आजच्या काळातही हुंडा (dowry) प्रथा सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. कायद्याचा धाक दाखवून,  समाजप्रबोधनाद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी हुंडा प्रथा संपलेली दिसत नाहीये. असाच काहीसा प्रकार एका डॉक्टर तरुणीसोबत घडला आहे. 25 लाख रुपये घेतल्यानंतर बीएमडब्ल्यू कारची (BMW Car) मागणी पूर्ण न केल्याने नवऱ्या मुलाने नवरीला विमानतळावरच (Goa Airport) सोडून पळ काढला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Faridabad Police) तक्रार दाखल केली आहे.

हरियाणातील या जोडप्याची मेट्रोमेनिअल साईटवर ओळख झाली होती. मुलगी फरिदाबादची तर मुलगा हा हिसार येथील असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन ओळख झाल्यानंतर दोघांची मने जुळली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याची मागणी मुलाच्या कुटुंबियांनी केली. ठरल्याप्रमाणे एका महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न पार पडले. मात्र लग्नानंतर मुलाने पत्नीला गोव्याच्या विमानतळावर सोडून पळ काढला, अशी तक्रार घेऊन मुलीचे कुटुंबीय फरिदाबाद येथील पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की मॅट्रिमोनियल साइटद्वारे त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न हिसारच्या डॉक्टर कुटुंबात करण्याचे ठरवले लावले होते. "मुलगा अबीर नेपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याचे वडील अरविंद गुप्ता आणि आई आभा गुप्ता हे दोघेही डॉक्टर आहेत. दोघे हिसारमध्ये हॉस्पिटल चालवतात. अबीरच्या पालकांनी सांगितले की होते की त्यांना त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. लग्नासाठी त्यांनी गोव्यातील महागडे रिसॉर्ट निवडले. साखरपुड्यानंतर मुलाच्या मागण्या समोर येऊ लागल्या. त्यांच्या छोट्या-छोट्या मागण्या आम्ही पूर्ण करू लागलो. दोन्ही पक्ष रिसॉर्टमधल्या लग्नाचा खर्च करणार असे ठरले होते. जानेवारीत सगळे लग्नासाठी गोव्यात आलो होतो. लग्नापूर्वी मुलांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगून त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली. मग सप्तपदीची वेळी आली तेव्हा मुलाकडचे  बीएमडब्ल्यू मागू लागले," असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.

मुलाच्या कुटंबियांनी काढला पळ

"जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण होतील तेव्हाच मुलीला सोबत घेऊन जाऊ, असे मुलाकडच्या लोकांनी सांगायला सुरुवात केली. मी त्यांना दिल्लीला पोहचून दोन-चार महिन्यांत मागणी पूर्ण करतो असे सांगितले. त्यानंतर मुलीचे लग्न झाले. पण मुलाकडे गुपचूप कोणालाही न भेटता रिसॉर्टमधून निघून गेली. त्यांनी रिसॉर्टमध्ये पैसेही भरले नाहीत. रिसॉर्टच्या लोकांनी आम्हाला पकडून ठेवले होते. कसे तरी नातेवाईकांना सांगून आम्ही 30 लाख रुपये मागवून घेतले," असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.

ट्रॅक पॅन्ट बदलायला गेलेला मुलगा परतलाच नाही 

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विमानतळावर पोहोचल्यावर वधूला तिथे सोडून मुलगा पळून गेला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर चेक इन केल्यानंतर मुलगा ट्रॅक पॅन्ट बदलण्याच्या बहाण्याने तेथून गायब झाला. गोवा पोलिसांच्या मदतीने आम्ही सीसीटीव्ही पाहिले. त्यात मुलगा विमानतळाच्या बाहेर पळताना दिसत होता, असेही मुलीच्या वडिलांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणानंतर मुलीच्या वडिलांनी फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर आम्ही सुमारे 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.