भावाला भांडणातून सोडवायला गेलेल्या गरोदर बहिणीने गमावलं बाळ; धक्कादायक Video समोर

Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका व्यक्तीला लोकांच्या गटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. 20 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

आकाश नेटके | Updated: May 26, 2023, 11:02 AM IST
भावाला भांडणातून सोडवायला गेलेल्या गरोदर बहिणीने गमावलं बाळ; धक्कादायक Video समोर

Crime News : तेलंगणातील (Telangana) मेडक जिल्ह्यात एका व्यक्तीला काही लोकांच्या गटाने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तेलंगणामध्ये एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही लोक घोषणाबाजी करत आहेत आणि एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. त्या व्यक्तीसोबत गर्दीत त्याची गरोदर बहीण आणि आईही होती. दोघेही त्या व्यक्तीला गर्दीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र गर्दीमध्ये तरुणाला धक्काबुक्की सुरु होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली त्याच्यावर गॅस सिलिंडर वितरीत करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ आणि बुटाने मारहाण केल्याचा आरोप आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक त्या व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. त्या व्यक्तीची आई आणि गरोदर बहीण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या भांडणानंतर बहिणीने दिलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे काही लोक बाळाच्या मृत्यूला या भांडणासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.

हा व्हिडिओ 7 मे रोजीचा असल्याचे समोर आले आहे. इम्रान अहमद असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. इम्रान अहमदचे नरसापूर परिसरात हॉटेल आहे. 7 मे रोजी त्याचे गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयसोबत भांडण झाले होते. यावर उजव्या विचारसरणीच्या संघटनेशी संबंधित काही लोकांचा जमाव इम्रानच्या घरी पोहोचला आणि त्याला रस्त्यावर ओढत आणले आणि बेदम मारहाण केली. यावेळी इम्रानच्या आईने बहिणीने मध्यस्थी कमी करण्याचा प्रयत्न केला.

नरसापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भांडणानंतर इम्रानच्या बहिणीने काही दिवसांनी मुलाला जन्म दिला, पण नंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र जमावाच्या मारहाणीत झालेल्या दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाला नसल्याचेची तरी पोलिसांनी सांगितले नाही. इम्रानच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. कुटुंबीयांनी तक्रार केल्यावर पोलीस तपासाला सुरुवात करु, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, नरसापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरानच्या बहिणीने 13 मे रोजी मुलाला जन्म दिला. हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मुलाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. नरसापूर पोलिसांनी इम्रानविरुद्ध आयपीसी कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर 10-15 जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.