पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपात होईल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 6, 2017, 12:21 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपात होईल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण, येत्या काळात पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी वाढणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

एका रिपोर्टनुसार, पेट्रोलचा दर ८० रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. तर, डिझेलच्या दरातही वाढ होणार आहे. डिझेलचा दर ६५ रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. २०१५ सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आता पेट्रोलच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच नागरिकांना महागाईचा झटका लागण्याची शक्यता आहे.

दोन वर्षात कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक

जुलै २०१५ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरल झाली होती. सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत ५५ डॉलर प्रति बॅरल होती. त्यानंतर जुन महिन्यात घसरण होऊन ४४ डॉलर प्रति बॅरल झाली. मात्र, गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जुन २०१७ नंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३६ टक्के वाढ झाली आहे. जुन महिन्यानंतर डब्ल्यूटीआय क्रूड ३० टक्क्यांनी महाग झालं आहे. तर, डिसेंबर अखेरपर्यंत कच्च्या तेलाची किंमत ६४ डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.

तज्ञांचा अंदाज...

वरिष्ठ विश्लेषक अजय केडिया यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार पहायला मिळत आहे. आता कच्च्या तेलाची किंमत गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे त्यामुळे याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होणार आहे.