असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार!

असनी चक्रीवादळ आज आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे. 

Updated: May 11, 2022, 09:29 AM IST
असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार! title=

ओडिसा : भारतीय हवामान खात्याने असनी चक्रीवादळ दाखल होण्यासबंधी अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ आज आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे

दरम्यान या वादळाचा वेग मंदावला आहे हे खरं, पण या वादळामुळे जवळपास 75 ते 85 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील हे जवळपास निश्चित झालंय. यामुळे समुद्र किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याद्वारे देण्यात आलाय. या वादळामुळे समुद्र मोठ्या प्रमाणावर खवळला आहे.

यापूर्वीही ओडिशामध्ये जंगम जिल्ह्यातील आर्यपल्लीमध्ये समुद्र मोठ्या प्रमाणावर खवळला होता. ज्यामध्ये मच्छिमारांची एक बोट वादळी वाऱ्यामुळे समुद्रात अडकली होती. अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतर मच्छिमारांनी कसाबसा जीव मुठीत घेऊन समुद्रकिनारा गाठला.

ही सगळी परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफच्या 50 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याद्वारे करण्यात आलं आहे.