Cyclone Asna : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) अर्थात आयएमडीकडून सध्या देशाच्या सागरी सीमांवर लक्ष ठेवत देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्येही चक्रीवादळ तयार झालं असून, आता या घोंगावणाऱ्या वादळामुळं देशातील बऱ्याच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, 'असना' असं या चक्रीवादळाचं नाव. दरम्यान या वादळाता भारतीय किनाऱ्याला थेट धोका नसला तरीही त्याचे अप्रत्यक्ष परिणाम मात्र इथं दिसणार आहेत. गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आता 'असना' चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे.
1976 नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात पहिल्यांदाच चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, या वादळाला पाकिस्तानने 'असना' असं नाव दिलं आहे. हे चक्रीवादळ सध्या कच्छ किनाऱ्याजवळ, भूजपासून 190 किमी अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भारतीय किनाऱ्याला कोणताही धोका नसून ते चक्रीवादळ पश्चिम- वायव्य दिशेने भारतीय किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार वादळाच्या या एकंदर प्रवासादरम्यान ताशी 63 ते 87 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार आहेत.
अरबी समुद्रातील चक्रीवादळासह मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.