'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 31, 2023, 09:00 AM IST
'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी title=
चक्रपाणि महाराजांनी केली अजब मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 23 ऑगस्ट रोजी 'ब्रिक्स' परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यामुळे ते सुद्धा भारतात परतल्यानंतर दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या मुख्य कार्यालयामध्ये वैज्ञानिकांचं कौतुक करण्यासाठी गेले होते. त्यावेळे त्यांनी चांद्रयान-3 ने लँडिंग केली त्या स्थळाला 'शिव-शक्ती' पॉइण्ट असं नाव दिलं. पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर अखिल भारतीय हिंदू संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी चंद्रासंदर्भात एक विचित्र मागणी केली आहे. 

मोदींचे आभार मानले

स्वामी चक्रपाणि यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र जाहीर करावं अशी मागणी केली आहे. संसदेने चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी चक्रपाणि यांनी केली आहे. याचबरोबर चांद्रयान-3 ने ज्या ठिकाणी लँडिंग केलं त्या ठिकाणाला म्हणजेच 'शिव-शक्ति'ला या हिंदू राष्ट्राची राजधानी घोषित करावी असंही चांद्रपाणि यांनी म्हटलं आहे. असं केल्याने तिथे दहशतवादी जिहादी मानसिकता पोहोचणार नाही असा दावा चांद्रपाणि यांनी केला आहे. तसेच चक्रपाणि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-3 च्या लँडरने टचडाऊन केलेल्या जागेला 'शिव-शक्ति' असं नाव दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 

मी मोदींचे फार आभार मानू इच्छितो. कारण त्यांनी चंद्रवार चांद्रयान-3 उतरलं त्या ठिकाणाला 'शिव-शक्ति' पॉइण्ट असं नाव दिलं आहे. मात्र मी अशीही मागणी करु इच्छितो की इतर कोणत्याही विचारसरणीचे आणि इतर देशांचे लोक तिथे जाऊन त्या जागेला 'गझवा-ए-हिंद' बनवू नये म्हणून संसदेमध्ये प्रस्ताव मांडून चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं जावं. 'शिव-शक्ति' पॉइण्टला त्याची राजधानी घोषित करावं.

चंद्राचं हिंदूंशी असलेलं कनेक्शन काय हे सांगितलं

अखिल भारतीय हिंदू संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या चक्रपाणि यांनी, चंद्रावर इतर कोणी जाऊन जिहाद जाहीर करण्याआधी, तिथे जाऊन कोणी कट्टर विचारसणी पसरवण्याआधी, दहशतवाद पसरवण्याआधी चंद्राला एक हिंदू राष्ट्र म्हणून सनातन राष्ट्र अशी मान्यता दिली जावी अशी मागणी केली. चंद्र हा भगवान शिवाच्या मस्तकावर असल्याने या राष्ट्राची राजधानी 'शिव-शक्ति' पॉइण्ट असावी असा युक्तिवादही चक्रपाणि यांनी केला आहे. हिंदू सनातनी लोकांचा चंद्राबरोबर जुने नाते असून त्यामुळेच चंद्राला चंदा मामा असं म्हटलं जात असल्याचा उल्लेखही चक्रपाणि यांनी केला. चंद्राचा आपल्या अनेक शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे चंद्राचं पावित्र्य आणि शुद्धता जपली गेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच मी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करत आहे, असा युक्तिवाद चक्रपाणी यांनी केला.  

पंतप्रधान मोदींनी 'शिव-शक्ति' पॉइण्टबरोबरच चांद्रयान-2 मोहिमेमधील लँडर ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या जागेला तिरंगा नाव दिलं आहे.