Dehli Crime News Bhojpuri Artiste Rape: दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये एका 24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाखतीच्या नावाखाली या अभिनेत्रीला एका हॉटेलमध्ये बोलवून इंन्स्टाग्रामवर भेटलेल्या एका कथित मित्रानेच हा घृणास्पद प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेने आपण भोजपुरी चित्रपटांमधील अभिनेत्री असल्याचं सांगितलं असून सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येनं फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री इन्स्टाग्रामवर फारच सक्रीय असून रोज वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असते. याच माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन या अभिनेत्रीची महेश पांडे नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. या अभिनेत्रीला महेशने भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये आपण काम मिळवून देऊ शकतो असं सांगितलं. 29 जून रोजी महेशने मुलाखतीच्या नावाखाली या महिलेला गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये बोलवलं. येथील उद्योग विहार परिसरामधील हॉटेलमध्ये या दोघांनी भेटण्याचं ठरवलं.
"मी हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा महेशने आधीपासूनच एक रुम बूक करुन ठेवली होती. या रुममध्ये तो मला घेऊन गेला. त्याने मला काही प्रश्न विचारले. त्यानंतर तो मद्यपान करु लागला. त्यानंतर मी त्या रुममधून बाहेर जाण्यास निखाले तेव्हा त्याने मला स्वत:कडे ओढलं आणि माझ्यावर जबरदस्ती करु लागला. त्याने माझ्यावर बलात्कार केला," असे आरोप या महिलेने केले आहेत.
आरोपीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने काही लोकांना माझ्यासमोरच फोन केला आणि काही सूचना केल्या. आपला खासगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी त्याने मला दिली होती. पोलिसांकडे गेलीस किंवा तक्रार केली तर आपण व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करु अशी धमकी आरोपीने दिलेली असंही या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करुन घेतली आहे. उद्योग विहार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वरुण दहिया यांनी आम्ही या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं. लवकरात लवकर पोलीस आरोपीला अटक करतील असंही पोलिसांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तींवर अती विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलिसांकडून अनेकदा केलं जात. अशा व्यक्तींना भेटायला जाताना कोणाला तरी सोबत न्यावे किंवा निर्जनस्थळी अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलेल्या व्यक्तींना महिलांना भेटू नये असंही अनेकदा सांगितलं जातं. मात्र याकडे दुर्लक्ष करुन अनेकदा महिला असा धोका पत्करतात आणि अडचणीत सापडतात. अशाप्रकारचे गुन्हे यापूर्वेही अनेकदा समोर आले आहेत.