Video : तिकीट विक्रीच्या आरोपावरुन AAPच्या आमदाराला कार्यकर्त्यांनीच केली मारहाण

AAP MLA thrashed : महापालिका निवडणुकांच्या आधी, आपवर तिकीट विक्रीच्या आरोपांमुळे सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. 

Updated: Nov 22, 2022, 12:59 PM IST
Video : तिकीट विक्रीच्या आरोपावरुन AAPच्या आमदाराला कार्यकर्त्यांनीच केली मारहाण title=

AAP MLA thrashed : दिल्लीत (Delhi) सध्या महापालिका निवडणुकांची (MCD polls) तयारी सुरु आहे. त्यामुळे पक्षांतर्फे प्रचाराला वेग आला आहे. मात्र राज्यात सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीच्या (आप) अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. निवडणूक तिकीटांच्या विक्रीचा आरोप आप नेत्यांवर केला जात आहे. दोन कथित स्टिंग ऑपरेशन आणि नंतर तिकीटाची मागणी करत टॉवरवर चढलेल्या कार्यकर्त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आपवर टीका केली जात आहे. यात आता भर म्हणून आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली भाजपने (BJP) सोमवारी आपचे आमदार गुलाबसिंह यादव (Gulab Singh Yadav) यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. गुलाबसिंग यांच्यावर महापालिका निवडणुकांसाठी तिकीटांची विक्री केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. (AAP MLA thrashed by Party Worker)

भाजप आणि इतर ट्विटर हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, गुलाबसिंह हे कार्यकर्त्यांच्या एका गटाशी जोरदार वाद घालताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांपासून वाचण्यासाठी सिंह यांनी पोलीस ठाण्याचा आश्रय घेतला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. मात्र, आपने हे स्टिंग ऑपरेशन बनावट असून आमदाराला मारहाण करण्याचा भाजपचा डाव असल्याचे म्हटले आहे.

सोमवारी सकाळी भाजपने एक कथित स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आणला होता. या व्हिडीओमध्ये उत्तर-पश्चिम दिल्लीमध्ये आपच्या एका माजी कार्यकर्त्याने पक्षावर महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा व्हिडीओ समोर आणला होता.

यानंतर संध्याकाळी तिकीट विक्रीच्या आरोपांवरुन वाद झाल्यानंतर  आपच्या काही कार्यकर्त्यांनी गुलाबसिंह यादव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजपने पुन्हा याचा व्हिडीओ समोर आणला आणि मारहाणीचा प्रकार समोर आणला.

 

गुलाबसिंह यादव यांनीही त्यांच्यावर हल्ला झाल्याचे मान्य केले पण त्यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचाही आरोप केला. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी भाजपचे नेते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले त्यामुळे भाजपनेचे हे केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. दरम्यान, द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून वाद झाला ज्यामुळे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी यादव यांना मारहाण केली.