Delhi Blast: रविवारच्या सकाळी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. करवा चौथच्या दिवशी दिल्लीतील शाळेजवळ स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोण दिसू लागले. स्फोटाच्या घटनेनंतर एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या स्फोटात काय वापरले गेले? संपूर्ण प्रकरण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला. एफएसएलची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचली. स्थानिक डीसीपी अमित गोयल यांनी या घटनेची माहिती दिली. हा स्फोट दहशतवादी हल्ला होता की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्फोटानंतर लगेचच धुराचे मोठे लोट दिसू लागले. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. स्फोटाच्या आवाजाने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि त्याचा स्रोत काय होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही.'आत्ताच काही सांगणे घाईचे ठरेल. तज्ज्ञांशी बोलल्यानंतरच परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देणे शक्य होईल', अशी माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली.