भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 18, 2023, 11:53 AM IST
भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या title=

Delhi Crime : राजधानी दिल्लीतील आरके पुरम (RK Puram) भागात 2 महिलांना आपल्या भावाचा जीव महागात पडले. हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 30 वर्षीय पिंकी आणि 29 वर्षीय ज्योती केके अशी मृत बहिणींची नावे आहेत. पैशावरुन झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना (Delhi Police) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेचा भाऊ ललित याने सांगितले की, रात्री कुणाकडून तरी पैसे घ्यायचे होते आणि काम संपवून मी घरी आलो होतो. काही वेळाने काही लोक माझ्या मावशीच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी गोंधळ घातला आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तिथून मला फोन आला असता मी त्यांना पोलिसांना फोन करण्यास सांगितले. काही वेळाने ते लोक माझ्या घरी पोहोचले आणि त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, यश न आल्याने ते परत गेले. दरम्यान, आवाज ऐकून कॉलनीतील लोक जमा झाले. परत 20 मिनिटांनंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा मोठ्या संख्येने तेच लोक माझ्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला. तिथे असलेल्या माझ्या दोन बहिणी बचावासाठी पुढे आल्या आणि मला इथून पळून जा असे सांगितले. एक गोळी माझ्या शरीराला चाटून गेली पण मी तेथून पळून जाण्यात यशस्वी झालो. संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी माझ्या दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दोघांनाही सफदरजंग रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ललितने सांगितले की, त्याच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एक जवळच एक क्लब चालवतो. हा सर्व प्रकार दिल्लीच्या दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील आंबेडकर वस्ती येथे घडला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त दक्षिण-पश्चिम मनोज सी यांनी सांगितले की, सकाळी 4:40 वाजता पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. फोन करणाऱ्याने काही अज्ञातांनी गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले होते. ज्यामध्ये त्याच्या बहिणींना गोळ्या लागल्या आहेत असेही सांगितले. स्थानिक पोलीस आणि पीसीआर टीमने घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला.

15 हजारांमुळे गेला दोन बहिणींचा जीव

आंबेडकर कॉलनीमध्ये शनिवारी रात्री सुमारे 10 ते 12 मुले येथे राहणाऱ्या ललितच्या घरी पोहोचले होते. देव नावाच्या मुलाने ललितकडून 15 हजार रुपये उसने घेतले आहेत. तेच पैसे वेळेवर न दिल्याने देवने ललितला मारण्यासाठी आरके पुरमच्या केडी कॉलनीतील मुलांना सोबत आणले आणि आधी ललितच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व मुले परत गेली. मात्र काही वेळाने सर्व मुले पिस्तुल घेऊन आली आणि ललितला सोबत घेऊन जाऊ लागली. दरम्यान ललितच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि पिंकी मध्ये आल्या. त्यानंतर ललितने संधी मिळताच तेथून पळ काढला, यादरम्यान हल्लेखोरांनी ज्योती आणि पिंकीवर गोळ्या झाडल्या मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबाराच्या आधी आणि नंतर पोलिसांना अनेकवेळा फोन करण्यात आला. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडल्या.

देव परिसरात बेटिंगचे काम करतो, असा आरोप आहे. त्यामुळे त्याने केडी कॉलनीत राहणारे सोनू बुकी, अर्जुन आणि मायकल यांच्यासह अनेक मुलांना बोलावून ललितला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान ललितच्या दोन्ही बहिणी मध्ये आल्या आणि ज्योती आणि पिंकीला गोळ्या लागल्या. पोलिसांनी मुख्य आरोपी अर्जुन आणि मायकलला अटक केली आहे. तर इतर काही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.