दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला

15 ऑगस्टच्या आधी पोलिसांना मोठं यश

Updated: Aug 9, 2018, 05:07 PM IST
दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह सगळ्याच राज्यांमध्ये 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु झाली आहे. दिल्लीसह सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. यातच दिल्लीला हादरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

मोठा कट उधळला

दिल्ली पोलिसांनी हत्यारांसह 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील हस्तगत करण्यात आला आहे. मोहम्मद आजिम आणि आस मोहम्मद असं या 2 आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी दोन कार्बाइन, 50 पिस्तूल आणि 50 काडतूसं या दोघांकडून हस्तगत केले आहे.

याआधी ही एकाला अटक

4 दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी भारतात हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केली होती. जम्मूच्या गांधी नगर भागातून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात गोळाबारुद जमा केला होता.

संपूर्ण देशात हायअलर्ट

स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु असताना सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाला दिल्लीत हल्ला करण्य़ाची दहशतवाद्यांची तयारी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर सगळीकडे सुरक्षा वाढवण्य़ात आली आहे.