दिल्ली हिंसाचार : या नगरसेवकावर संशय, घराच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३७ जणांचा जीव गेला आहे.

Updated: Feb 27, 2020, 06:49 PM IST
दिल्ली हिंसाचार : या नगरसेवकावर संशय, घराच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा title=

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३७ जणांचा जीव गेला आहे. याप्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतल्या या हिंसाचाराबाबात आप नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावरचा संशय बळावला आहे. ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा, दगडांनी भरलेल्या गोण्या, बेचकी, वीटा, केमिकल, अॅसीडच्या पिशव्या सापडल्या आहेत.

ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावरुन हल्ला करण्याचे आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. हिंसाचारात आयबी ऑफिसर अंकित शर्मा यांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबानेही ताहिर हुसेन आणि त्यांच्या लोकांवर आरोप केले आहेत.

ताहिर हुसेन यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी स्वत: दंगलीमधला पीडित आहे. स्वत:चा जीव वाचवून मी तिकडून पळून गेलो, असं ताहिर हुसेन म्हणाले आहेत. 'मी हिंसाचार थांबवण्यासाठी काम केलं. मी निर्दोष आहे. माझ्या इमारतीवर चढण्यापासून मी लोकांना रोखलं,' अशी प्रतिक्रिया ताहिर हुसेन यांनी दिली आहे.

'२४ फेब्रुवारीला पोलिसांनी माझ्या इमारतीची झडती घेतली आणि आम्हाला इमारतीमधून बाहेर काढलं. यानंतर आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो. २५ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पोलीस इमारतीमध्ये होते. या परिसरात पोलिसांनी उपस्थित असावं, म्हणून मीच विनंती केली होती. माझ्या इमारतीला लक्ष्य केलं गेलं आणि चुकीच्या कारणांसाठी माझ्या इमारतीचा वापर होईल, असा संशय मला होता, म्हणून मी पोलिसांना बोलावलं. पोलीस तिकडे उपस्थित होते, त्यामुळे नेमकं काय झालं हे तेच सांगू शकतात,' असा दावा हुसेन यांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेन यांची इशान्य दिल्लीच्या खजूरी खास भागात असलेली फॅक्ट्रीही सील केली आहे.