दिल्लीच्या कपूर कुटुंबीयांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुखरूप घरी

कोरोना व्हायरससोबत दोन हात करताना कपूर कुटुंबीयांचा विजय.   

Updated: Mar 15, 2020, 09:36 AM IST
दिल्लीच्या कपूर कुटुंबीयांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुखरूप घरी  title=

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आग्रामधील एकाच कुंटुबातील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण कोरोनासोबत दोन हात करताना कपूर कुटुंबीयांचा विजय झाला आहे. 

कोरोनापासून मुक्त झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना मुक्त घोषित केले आहे. आग्रामध्ये व्यवसाय करणारं हे कुटुंब २५ फेब्रुवारी रोजी इटलीवरून भारतात परतलं होतं. 

इटलीतून मायदेशी परतल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याला सर्दी तापाची लागण झाल्यामुळे त्याची कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर इतर कुटुंबीयांची देखील टेस्ट करण्यात. 

अखेर एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या ६ जणांची चाचणी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये करण्यात आली. अखेर उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले आहेत.

त्याचप्रमाणे, राज्यातल्या ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यात सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.