चंदीगड : हरियाणात सिरसा इथल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आलीय.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निमलष्करी दलाची ४१ पथकं, लष्कराच्या चार तुकड्या, पोलिसांचा ताफा, श्वान पथक, आणि बॉम्ब स्कॉवड डेऱ्याच्या आतल्या भागात दाखल झालेत.
जेसीबी मशीन्स आणि १० लोहारही यावेळी सोबत नेण्यात आलेत. त्यामुळे सातशे एकर जागेवरील आश्रमात पाडकाम, खोदकाम सुरु झालंय. या सगळ्या शोधमोहिमेचं चित्रीकरण करण्यात येत असून दिवसभर हे काम सुरु राहणार असल्याचं म्हटलं जातंय.
राम रहिमच्या डेऱ्यात अनेकांची हत्या करण्यात आली असून त्यांची हाडं तिथंच जमिनीत पुरण्यात आल्याचा आरोप बलात्कार खटल्याच्या सुनावणी वेळी करण्यात आला होता. त्यामागचं रहस्यही या शोधमोहिमेत उलगडलं जाणार आहे.