केंद्र सरकारचा सावळागोंधळ; कोरोना रुग्णांच्या आकड्यात तफावत

या दोघांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे. 

Updated: Apr 27, 2020, 11:23 AM IST
केंद्र सरकारचा सावळागोंधळ; कोरोना रुग्णांच्या आकड्यात तफावत title=

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य सचिवांसह राज्यभरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या आकडेवारीतील विसंगती उपस्थित केली गेली. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील National Centre for Disease Control (NCDC) आणि Indian Council of Medical Research (ICMR) यांनी नोंद केलेली आकडेवारी या बैठकीत सादर करण्यात आली. परंतु NCDC आणि  ICMR कडून बैठकीत सादर करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत मोठा फरक आढळून आला. कोरोना रुग्णांतील आकड्यांच्या या तफावतीमुळे काही रुग्ण राहून जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत NCDC कडून भारतात एकूण 26,496 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ICMR कडून भारतात 27,583 रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे NCDC आणि ICMR या दोघांमधील आकड्यांमध्ये तब्बल 1087 रुग्णांची तफावत आढळून आली.

या बैठकीत सादर करण्यात आलेल्या संपूर्ण आकडेवारीत, एनसीडीसी आणि आयसीएमआरमधील आकडेवारी केवळ आठ क्षेत्रांमध्ये जुळली असल्याचं समोर आलं. ईशान्येकडील 5 राज्यांसह, दादरा नगर हवेली, दमण-दिव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशातील आकडेवारी जुळली आहे.

21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण कोरोना रुग्ण, 26 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत NCDCच्या आकडेवारीच्या तुलनेत, ICMRच्या आकडेवारीत अधिक आहे.

या दोघांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ICMRच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 8848, गुजरात 3809 आणि पश्चिम बंगालमध्ये 770 रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात आलं. तर  NCDCने दिलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रात 7628, गुजरात 3071 आणि पश्चिम बंगालमध्ये 611 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

दुसरीकडे NCDC आणि ICMRने दिलेल्या माहितीत, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी तफावत आढळली आहे.NCDCनुसार दिल्लीत 2625, मध्य प्रदेश 2096 आणि उत्तर प्रदेशमध्ये 1793 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर  ICMRनुसार, दिल्लीत 2155, मध्य प्रदेश 1778 आणि उत्तर प्रदेशमध्ये 1572 रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे.

21 राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्रात असून, हा आकडा 1220 इतका आहे. तर सर्वात कमी नागालँडमध्ये केवळ एका रुग्णाची तफावत आढळली आहे.