सावधान! बाळाला कुशीत घेऊन स्वयंपाक करु नका; अहवालातून धक्कादायक बाब समोर

Dirty Cooking Fuels Threaten Infants: खराब इंधनामुळं भारतातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असे एका अहवालात समोर आलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2024, 09:11 AM IST
सावधान! बाळाला कुशीत घेऊन स्वयंपाक करु नका; अहवालातून धक्कादायक बाब समोर title=
Dirty cooking fuels threaten infants in India says Cornell University studies

Dirty Cooking Fuels Threaten Infants: भारतात जेवण शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या संपर्कात आल्याने प्रत्येकी 1 हजार नवजात बालकांपैकी 27 बालकांना प्राण गमवावा लागत आहे. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विश्वविद्यालयाने जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अहवालात 1992 ते 2016 पर्यंतचे आकडे देण्यात आलेले आहेत. कोर्नेल विद्यापिठात चार्ल्स एच. डायसन स्कूल ऑफ एप्लाअड इकोनॉमिक्स अँड मॅनेजमेंटचे प्रोफेसर अर्णब बसू आणि अन्य लेखकांनी भारतातील स्वयंपाकासाठी वापरात असलेल्या इंधनाचा पर्याय आणि बालमृत्यू' या शीर्षकाच्या अहवालात 1992 ते 2016 या कालावधीतील मोठ्या प्रमाणावर घरगुती सर्वेक्षणाचा डेटा वापरण्यात आला आहे.

प्रदूषणाचा फैलाव करणाऱ्या या इंधनाचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हे या अहवालात मांडण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की, इंधनाचा परिणाम एक महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या नवजात बालकांवर होतो. कारण या बालकांच्या फुफ्फुसांचा पूर्णपणे विकास झालेला नाही. तसंच, नवजात बालक हे जास्तकरुन त्यांच्या आईच्या कुशीत असतात आणि आईहीच घरात जेवण बनवून देणारी मुख्य सदस्य असते. रिपोर्टनुसार, 1992 ते 2016 दरम्यान भारतात जेवण शिजवण्यासाठी सर्वात निकृष्ट इंधनाचा वापर केला जायचा. त्यामुळं या इंधनाच्या संपर्कात आल्याने प्रत्येकी 1000 नवजात बालके आणि 27 मुलांना प्राण गमवावे लागत होते. 

बासू यांनी दावा केला आहे की, भारतीय घरांमध्ये यामुळं मुलांपेक्षा मुलींचा अधिक मृत्यू होत होता. याचा अर्थ मुली अधिक नाजूक किंवा प्रदूषणाशी संबंधित श्वसनाच्या आजारांना बळी पडतात, असा नाही. भारतीय घरांमध्ये मुलांना जास्त प्राधान्य दिले जाते. मुलगी आजारी पडते किंवा खोकला झाल्यानंतर कुटुंबीय दुर्लक्ष करतात. तिला तत्परतेने डॉक्टरकडे नेत नाहीत. स्वच्छ इंधनाचा वापर केल्यास त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होणार नाही, असं बसू यांचे मत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या ही स्टोव्ह किंवा चुलीवर जेवण शिजवतात. यात लाकूड, शेणखत, काडीकचरा यांचाही वापर करण्यात येतो. त्यामुळं जगभरात जवळपास 32 लाख लोकांचा मृत्यू होतो. सरकारने घरातील प्रदूषणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं बसू यांनी म्हटलं आहे. 

भारतात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी लाकूड, शेणखत या इंधनाचा वापर केला जातो. त्यामुळं धुराच्या संपर्कात आल्याने त्याचा फटका मुलांच्या आरोग्यावर होतो. केंद्र सरकारही स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या चूलीच्या जागी गॅस सिलेंडर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला अद्यापही यश आलेलं नाहीये.