दिल्लीतील घडामोडींना वेग, राहुल गांधींचा केजरीवालांना निर्वाणीचा इशारा

दिल्लीत भाजपचे उच्चाटन करण्यासाठी काँग्रेस-'आप'ची युती गरजेची आहे.

Updated: Apr 15, 2019, 07:37 PM IST
दिल्लीतील घडामोडींना वेग, राहुल गांधींचा केजरीवालांना निर्वाणीचा इशारा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येताना दिसला. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) युतीसाठी चर्चा करत आहे. मात्र, जागावाटपावरून काँग्रेस-'आप'च्या युतीचे घोडे अजूनही अडून बसलेले आहे. मध्यंतरी 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी युतीसाठी फारशी उत्सुकता दाखवत नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विट करून थेटपणे भाष्य केले. या ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, दिल्लीत भाजपचे उच्चाटन करण्यासाठी काँग्रेस-'आप'ची युती गरजेची आहे. काँग्रेस दिल्लीतील चार लोकसभा मतदारसंघ 'आप'साठी सोडायला तयार आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. 'आप'साठी आमचे दरवाजे उघडे आहेत, पण वेळ हातातून निसटत चालला आहे, हे ध्यानात राहू द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस व आप युती करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

दिल्लीत युती करण्यासाठी आपने काँग्रेसपुढे काही अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये दिल्लीत युती करायची असेल तर हरियाणा आणि चंदीगढमध्येही एकत्र निवडणूक लढवाव्यात. तसेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेसने समर्थन द्यावे, या अटींचा समावेश आहे. 

तर दुसरीकडे आपचे नेते संजय सिंह यांनी पंजाबमधील स्थितीवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंजाबमध्ये आपचे चार खासदार आणि २० आमदार आहेत. मात्र, याठिकाणी काँग्रेस आमच्यासाठी एकही जागा सोडायला तयार नाही. पण दिल्लीत एकही खासदार किंवा आमदार नसूनही काँग्रेस आमच्या तीन जागा मागत आहे. तडजोड अशी होते का? मग काँग्रेसला इतर राज्यांमध्ये भाजपला रोखायचे नाही का, असा सवालही संजय सिंह यांनी उपस्थित केला.