गुजरातमध्ये एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर पोलिसांसमोरच राडा घातला. वडोदरा येथे रविवारी रात्री ही घटना घडली. महिला दारुच्या नशेत गाडी चालवत होती. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करताना महिलेने एका कारला धडक दिली. यादरम्यान पोलीस कारवाईसाठी पोहोचले असता महिलेने त्यांच्याशी वाद घातला. यादरम्यान, ती पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न करत होती. यावेळी महिला पोलीस कर्मचारी तिला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
वडोदरा येथे रविवारी रात्री ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचं प्रकरण समोर आलं. एक महिला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होती. याच अवस्थेत तिने एका गाडीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अटक करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने रस्त्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांवर हातही उचलला. यादरम्यान तिथे उपस्थित गर्दीने मोबाईलवर व्हिडीओ शूट केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिला पोलिसांना शिवीगाळ करत अटक करुन दाखवण्याचं जाहीर आव्हान देताना दिसत आहे. एक महिला पोलीस कर्मचारी तिला अडवण्याचा प्रयत्न करत असताना, महिला मात्र पुरुष कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जातानाही दिसत आहे. यावेळी ती अनेकदा पुरुष कर्मचाऱ्यांना हिंमत असेल तर आपल्या अंगाला हात लावून दाखवण्याचं आव्हान देते. दरम्यान, महिलेला नियंत्रणात आणण्यासाठी नंतर महिला पोलिसांची अतिरिक्त फौज मागवण्यात आली.
Video a drunk woman creating ruckus on street in Vadodara, Gujarat is viral on social media.
She turned out to be a well-known female artist pic.twitter.com/E3twoBnYSE
— Megh Updates (@MeghUpdates) August 27, 2023
महिलेचा हा गोंधळ बराच वेळ सुरु होता. अखेर महिला पोलिसांनी तिला पकडलं आणि पोलीस जीपमधून घेऊन गेले. महिला पोलीस कर्मचारी जीपमध्ये बसवत असताना तिने एकीच्या कानाखाली मारली. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही तिला चांगलाच धडा शिकवला. त्याचाही व्हिडीओ समोर आला आहे.
कायद्यानुसार, पुरुष पोलीस कर्मचारी महिलेला अटक किंवा इतर कारवाई करु शकत नाही. फक्त महिला पोलीस कर्मचारीच महिला आरोपीला हात लावू शकतात किंवा अटक करु शकतात. महिलेविरोधात मद्यपान करुन गाडी चालवणे, गोंधळ घालणे आणि सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी ही महिला प्रसिद्ध नेल आर्टिस्ट असल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, गुजरातमध्ये दारुबंदी आहे. मद्याची बेकायदेशीर विक्री करणं आणि सेवन करणं कायदेशीर गुन्हा आहे.