हादरा! देशातील अनेक भागांमध्ये भूकंप

लडाखसह महाराष्ट्रही हादरला.... 

Updated: Sep 8, 2020, 10:05 AM IST
हादरा! देशातील अनेक भागांमध्ये भूकंप title=

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये भूकंप झाल्याची बाब प्रकर्षानं पुढे येऊ लागली आहे. कमी जास्त तीव्रतेचे हे धक्के चिंता वाढवणारी बाबही ठरत आहे. असं असलं तरीही सुदैवानं आतापर्यंत यामध्ये कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाच्या या चर्चा शमत नाहीत, तोच आता पुन्हा एकदा देशातील बहुतांश भागांना धरणीकंपाचा हादरा बसल्याचं वृत्त आहे. 

मंगळवारी लडाख, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (National Centre for Seismology-NCS)च्या माहितीनुसार लडाखच्या कारगिल भागात पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. याची तीव्रता ४.४ रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर - पश्चिम भागात ४३५ किमी.वर होता. 

लडाखमध्ये भूकंप येण्यापूर्वी अंदमान- निकोबार बेट समुहांमध्येही धरणीला हादरा बसल्याचं जाणवलं. या भागात भूकंपाचा केंद्रबिंदू बेट समुहापासून २० किलोमीटर दूर डिगलीपूर येथे होता. इथं जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.० रिक्टर स्केल इतकी होती. सोमवारी मध्यरात्र उलटून तीन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप जाणवला होता. लडाखसह महाराष्ट्रातही सोमवारी मध्यरात्र उलटून १ वाजून ०५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. पालघर येथे जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.१ रिक्टर स्केल इतकी होती. 

 

महाराष्ट्रात सातत्याने भूकंपाचे हादरे 

सोमवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पालघर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळं इथे कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण, जनमानसात मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.