'लॉकडाऊनमुळे मृत्यूचं प्रमाण वाढेल', राहुल गांधींचं मोदींना पत्र

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

Updated: Mar 30, 2020, 12:10 AM IST
'लॉकडाऊनमुळे मृत्यूचं प्रमाण वाढेल', राहुल गांधींचं मोदींना पत्र title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. अचानक केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये घबराट आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, असं राहुल गांधी या पत्रामध्ये म्हणाले आहेत. लॉकडाऊनमुळे गरिबांच्या परिस्थितीवर बोट दाखवत राहुल गांधींनी त्यांच्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसंच भारतातली परिस्थिती वेगळी आहे, हे समजून घेतलं पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

इतर देशांपेक्षा भारतातली परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपल्याला वेगळी पावलं उचलावी लागणार आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या गरिबांची संख्या भारतात मोठी आहे. कारखाने, लघू उद्योग, बांधकाम व्यवसाय बंद झाला आहे. हजारो मजूर स्वत:च्या राज्यात जाण्यासाठी धोक्याचा प्रवास करत आहेत, असंही राहुल गांधींनी मोदींना लिहिलेल्या या पत्रात सांगितलं.

संपूर्ण अर्थव्यवस्था बंद केल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढेल, अशी भीती राहुल गांधींनी व्यक्त केली आहे. मजुरांना राहण्यासाठी घर देणं आणि  पुढचे काही महिने त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा करणं महत्त्वाचं आहे, असं राहुल गांधी पत्रात म्हणाले आहेत.

संपूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे लाखो बेरोजगार तरुण गावाकडे जातील, यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि गावातल्या वृद्धांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, अशी भीती राहुल गांधींनी या पत्रात व्यक्त केली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात कोरोोनाचे ९७९ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.