माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून तब्बल ५ तास चौकशी

 फारुख अब्दुल्ला पुन्हा अडचणीत आले आहेत.

Updated: Jul 31, 2019, 07:11 PM IST
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून तब्बल ५ तास चौकशी title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पुन्हा अडचणीत आले आहेत. अब्दुल्ला यांची प्रवर्तन संचलनालयाकडून (ईडीकडून) चौकशी करण्यात आली. जम्मू काश्मीर क्रिकेट मंडळ (जेकेसीए) घोटाळ्या संदर्भात ही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष होते.  

जम्मू कश्मीर क्रिकेट मंडळात (JKCA) काही वर्षांपूर्वी काही कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. याच प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार अब्दुल्ला यांची चंडीगढ येथील कार्यालयात बुधवारी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये (जेकेसीए) २०१०-११ दरम्यान हा घोटाळा झाला होता. 

जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. सीबीआयने देखील या प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांची गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात चौकशी करण्यात आली होती.

नक्की काय आहे प्रकरण ?

सीबीआयने जम्मू काश्मीर क्रिकेट मंडळात सुरु असलेली अनियमितता आणि घोटाळया बाबातीत अब्दुल्ला आणि इतर ३ जणांविरोधात श्रीनगरमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 

तत्कालीन अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, तत्कालीन महासचिव मोहम्मद सलीम खान, तत्कालीन कोषाध्यक्ष अहसान अहमद मिर्जा आणि जेएंडके बँकेचा कर्मचारी बशीर अहमद मिसगरवर कट आणि विश्वासघात केल्याचे आरोप लावले होते. बीसीसीआयने २००२ ते २०११ दरम्यान राज्यात क्रिकेट सुविधांच्या विकासासाठी ११२ कोटी दिले होते. आरोपींनी या रक्कमेतून ४३.६९ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप झाला होता.