सरकारनं पाठवलाय Emergency Alert; तुमच्या मोबाईलवरही हा इशारा आल्यास त्याचा अर्थ काय?

Emergency Alert : मोबाईलवर दर दिवशी असंख्य मेसेज येतात, नोटीफिकेशन येतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. पण, सध्या एक असा अलर्ट सर्वांना मिळाला आहे की एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 15, 2023, 02:30 PM IST
सरकारनं पाठवलाय Emergency Alert; तुमच्या मोबाईलवरही हा इशारा आल्यास त्याचा अर्थ काय?  title=
emergency alert on phone did you receive any such message know the meaning

Emergency Alert : सध्याच्या घडीला दहा माणसांपैकी किमान नऊ जणांचं डोकं हातातल्या मोबाईल फोनमध्येच असतं. अशा या सर्व मंडळींमध्ये तुम्हीआम्हीही आलोच. मोबाईलमध्ये डोकावत असतानाच तुमचीही नजर एका मेसेजवर गेली आहे का? लाल रंगात लक्ष वेधेल असाच हा मेसेज, नव्हे कर शासनाकडून पाठवण्यात आलेला अलर्ट तुम्हालाही आला आहे का? गोंधळून न जाता एक बाब लक्षात घ्या की, सरकारकडून नुकतेच असे अलर्ट देशातील नागरिकांना पाठवण्यात आले आहेत. 

Emergency Alert मुळं तुमचाही गोंधळ उडालाय का? 

तुमच्याही मोबाईलवर आपत्कालीन अलर्ट आला असल्यास घाबरून जाऊ नका आणि इतरांनाही गोंधळवू नका. कारण, हा अलर्ट शासनाकडून पाठवण्यात आला असला तरीही सध्या तो चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या केंद्राकडून emergency alerts सेवेची चाचणी सुरु असल्यामुळं अनेकाच्याच मोबाईलवर हा मेसेज आला आहे. 

20 जुलै रोजी भारत सरकारकडून emergency alerts संदर्भातील सर्वात पहिली माहिती देशातील नागरिकांना दिली होती. जिथं नैसर्गिक आपत्तीशी लढा देण्यासाठी आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी अशा अलर्ट यंत्रणांचा वापर करण्यात येणार असून, त्यासाठी टेस्टिंग करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. हा एक असा अलर्ट आहे, ज्या माध्यमातून एक सूचना एकाच वेळी देशभरातील नागरिकांना दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं.

हेसुद्धा वाचा : तब्बल 90 वर्षांपूर्वी भारतात धावलेली पहिली AC ट्रेन; कोच थंडगार ठेवण्यासाठी लढवलेली एक शक्कल 

 

सरकार या यंत्रणेसाठी इतकं आग्रही का? 

emergency alerts हा इशारा जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात एखाद्या संकटसमयी पाठवला जाईल तेव्हा एक वेगळीच रिंगटोन वाजेल. ज्या माध्यामातून तुम्हाला आपत्तीचा इशारा मिळेल. ही आगळीवेगळी यंत्रणा सरकार आणि दूरसंचार विभागाच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आली आहे. जिथं नैसर्गिक आपत्तीची पूर्वसुचना नागरिकांना मिळणार आहे. आपत्तीच्या वेळी नागरिकांना बचावासाठी मदत मिळावी आणि येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना लागावी यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

ही वायरलेस emergency alert यंत्रणा फक्त नैसर्गिक आपत्तीबद्दलच सतर्क करणार नाही, तर युद्ध किंवा तत्सम संकटांबाबचही बऱ्याच मदतीची ठरणार आहे. मुख्य म्हणजे कोविड काळातही या सेवेचा वापर करणं फायद्याचं ठरलं असतं असंच जाणकारांचं मत.