Indian Railways First AC Train : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. स्वातंत्र्यापूर्वी सुरु झालेला रेल्वेचा हा प्रवास अद्यापही सुरुच आहे आणि तोसुद्धा कमाल वेगानं. जसजसा काळ बदलला तसतशी रेल्वेची रुपंही बदलली. त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाही तितक्याच वेगानं बदलल्या, खऱ्या अर्थानं Update झाल्या. मागील काही वर्षांमध्ये रेल्वेतील सुधारणा अतिशय वेगानं झाल्या. इतकंच नव्हे तर, नव्या तंत्रज्ञानाच्या साथीनं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवास अविस्मरणीय झाला.
हल्ली रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बळावर रेल्वेचा प्रवासही जलदगतीनं होत असल्यामुळं सर्व स्तरांतील नागरिकांचं रेल्वेला प्राधान्य. त्यातही AC कोचनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा. किफायतशीर तिकिट आणि तशा सुविधा देण्यात येत असल्यामुळं आता एसी डब्यातून अनेकजण प्रवास करताना दिसतात. हा आकडा पाहता बहुतांश रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आल्या आहेत. पण, तुम्हाला माहितीये का भारतात पहिली AC रेल्वे केव्हा धावली?
भारतीय रेल्वे विभागात असणाऱ्या नोंदीनुसार भारतातील पहिल्या AC ट्रेनचं नाव गोल्डन टेंपल मेल (फ्रंटियर मेल) असं होतं. ही इंग्रजांच्या काळातील ट्रेन 1 सप्टेंबर 1928 ला पहिल्यांदाच प्रवासाला निघाली होती. गतकाळात हीच रेल्वे फ्रंटियर मेल म्हणूनही ओळखली जात होती. मुंबई सेंट्रल ते लाहोर असा मोठा प्रवास करणाऱ्या या रेल्वेचा मार्ग स्वातंत्र्यानंतर कमी करत मुंबई ते अमृतसर इतका करण्यात आला.
भारतातील पहिल्या एसी ट्रेनमध्ये बर्थ, खुर्ची आणि प्रसाधनगृहाची सुविधा देण्यात आली होती. शिवाय कोचमध्ये पंखे आणि वीजेच्या दिव्यांचीही सोय करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर, ही त्या वेळची सर्वाधिक वेगवान ट्रेन असून, एकदा ती अवघी 15 मिनिटं उशिरानं आली होती तेव्हा ब्रिटीशांनी चांगलाच गोंधळ घातला होता. ज्यानंतर रितसर तपास करत जबाबदार अधिकाऱ्यांवर रेल्वे विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.
ही भारतातील पहिली एसी ट्रेन असली तरीही तिला एसी डबे 1934 मध्ये जोडण्यात आले होते. ज्यामधून फक्त ब्रिटीशांनाच प्रवासाची मुभा होती. ही तीच मंडळी होती ज्यांना भारतातील उकाडा सहन होत नसेल. त्यावेळी AC चं संशोधन झालं नसल्यामुळं रेल्वेचे डबे थंड ठेवण्यासाठी बर्फाच्या सळ्यांचा वापर केला गेला होता. ज्यासाठी रेल्वे डब्याच्या खालच्या बाजुला खोके तयार करण्यात आले होते जिथं ट्रेन प्रवासाला निघण्यापूर्वी बर्फ ठेवला जायचा. त्यावर पंखे लावण्यात आले होते जेणेकरून बर्फातून निघणारी थंड वाफ पंख्यांवाटे डब्यांमध्ये पोहोचू शकेल. मानाच्या प्रवाशांसाठीचा हा सारा खटाटोप पाहता आता ही बाब ऐकून तुम्हालाही कमालच वाटेल नाही?