Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झालाय. यामध्ये एका पक्षानं (Bird) तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. केरळच्या एका शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमातील (Independence Day) हा व्हिडीओ आहे, यामध्ये ध्वजारोहण सुरु असताना झेंडा खांबावर वरच्या बाजूला जातो, तेवढ्यात एक पक्षी उडत येतो आणि ध्वज फडकवून निघून जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे..
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या व्हिडीओची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगलीय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या मनात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. निसर्गाचा चमत्कार वगैरे असा दावाही काहींनी केलाय. खरचं या पक्ष्यानं तिरंगा फडकवला का?, झेंड्याची अडकलेली गाठ या पक्ष्यानं खरचं सोडवली का?, हा व्हिडीओ खरा आहे की कोणी मॉर्फ केला आहे? हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केलाय.
15 ऑगस्टनिमित्त केरळमधील एका शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. हा व्हिडीओ त्याच कार्यक्रमामधील आहे. पहिल्या व्हिडिओत एक पक्षी उडत येताना दिसतोय आणि ध्वजाची गाठ सोडवून निघूना जाताना पाहायला मिळतोय. त्यानंतर ध्वज डौलाने फडकतोय.
Kerala - National Flag got stuck at the top while hoisting. A bird came from nowhere and unfurled it!! pic.twitter.com/lRFR2TeShK
— Shilpa (@shilpa_cn) August 16, 2024
पण मात्र, याच घटनेचा दुसरा व्हिडीओ देखील समोर आलाय. दुसऱ्या व्हिडिओ वेगळ्या अँगलने घेतलाय. यात ज्यावेळी तिरंगा वर जातो तेव्हा हा पक्षी येऊन बाजुच्या नारळाच्या झाडावर बसलेला दिसतोय आणि तितक्यात ध्वज फडकतोय. त्याचवेळी हा पक्षी नारळाच्या झाडावर बसतो आणि काही वेळातचं उडून जात असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पक्षाने ध्वजाची गाठ सोडवल्याचा व्हायरल व्हिडिओमध्ये केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. केवळ कॅमेऱ्याच्या अँगलमुळे तसा भास होतोय.
पण पक्ष्यानं जरी हा तिरंगा फडकवला नसला, तरी हे दृश्य अनेकांना सुखावणार होतं हे नक्की.