13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

Financial Fraud Of 39 Lakhs: या महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भात एका व्यक्तीशी वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर ती जवळपास 2 महिने या व्यक्तीच्या संपर्कात होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 12, 2024, 02:43 PM IST
13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं title=
पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली (प्रातिनीधिक फोटो)

Financial Fraud Of 39 Lakhs: दिल्लीमध्ये फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका सायबर चोराने महिलेला 39 लाख रुपयांना गंडा घातला आहे. मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच या महिलेला हा गंडा घालण्यात आल्याने तिच्यासमोरील आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. या महिलेला जितक्या रकमेचं कर्ज हवं होतं त्याच्या 3 पट रक्कम या सायबर चोराने महिलेकडून घेतली आणि तिची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुरुवारी सविस्तर माहिती नोंदवून घेतली.

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेंद्र डबरालला दिल्लीतील रोहिणी परिसरामधून अटक करण्यात आली. पीडित महिलेने केलेल्या दाव्यानुसार न्यू अशोक नगर येथील रहिवाशी असलेल्या डबरालने 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली 39 लाख रुपये घेतले. रोहिणीचे पोलीस आयुक्त जी. एस. सिद्धू यांनी दिलेल्या माहितीनुसार, डबरालकडून 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या फोनच्या माध्यमातून तो महिलांची फसवणूक करण्यासाठी करायचा. फसवणुकीसंदर्भात एनसीआरपी म्हणजेच नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर या महिलेने तक्रार दाखल केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिला 13.30 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज हवं होतं. त्यासाठी या महिलेने सुलेखा डॉट कॉमला भेट दिली. मात्र या वेबसाईटवरुन तिला जी कर्ज देणारी व्यक्ती भेटली ती फसवणूक करणारी निघाली. कर्ज देण्याच्या नावाखाली या महिलेला या कथित दलालाने तब्बल 39 लाखांचा गंडा घातला.

समोरुन फोन आला अन्...

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 10 एप्रिल 2023 ला पीडित महिलेला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपली ओळख सांगताना लोन ब्रोकर असल्याचं सांगितलं. नकुल असं आपलं नाव असून मी तुम्हाला कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करु शकतो असं त्याने सिद्धूला सांगितलं. मी तुम्हाला आर. एस. एंटरप्रायझेस कंपनीमधून कर्ज मिळवून देऊ शकतो. यानंतर नकुलने कर्जासाठीची फी, कागदपत्रं पडताळणी, कर्ज मंजुरी, पहिला ईएमआय, एनपीसीआय मंजूरासारख्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी म्हणून काही पैसे भरण्यास सांगितलं. या महिलेने ऑनलाइन माध्यमातून वेळोवेळी रक्कम भरली.

70 हून अधिक ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये 39 लाख रुपये दिले

डीसीपी सिद्धू यांनी पीडिताने 2 महिन्यांमध्ये 70 हून अधिक ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये 39 लाख रुपये नकुलला दिले. पोलिसांनी बुधवारी न्यू अशोक नगरमधून नकुलला अटक केली. त्याचं खरं नाव शैलेंदर डबराल असल्याचं स्पष्ट झालं. डबरालने आपण पूर्वी कर्ज देणारा एजंट म्हणून काम करायचो अशी कबुली दिली. सुलेखा डॉट कॉमवरुन आपण कर्ज शोधणाऱ्यांचा माग घ्यायचे आणि त्यांच्याशी संपर्क साधायचो. अधिक पैसे मिळवण्यासाठी शैलेंदरने फसवणुकीचा मार्ग निवडण्याचं ठरवलं. तो सुरुवातीला ग्राहकांकडून कागदपत्रं गोळा करायचा आणि नंतर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे जमा करण्यासाठी सांगायचा. पुढील प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. इतरही असे पीडित आहेत का याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत.